वारसा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे यायला हवा : महापौर मुक्ता टिळक

0

विश्रांतवाडी । हरिपाठाचा वारसा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे यायला हवा; तरच आपल्या महान संस्कृती व परंपरांचे जतन योग्य प्रकारे होईल, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. संदर्भ प्रकाशनच्या वतीने डॉ. लता पाडेकर लिखित ‘हरिपाठ एक आनंदवाट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, नाम हे साध्य असून तिथपर्यंत पोहचण्याचे साधन म्हणजे ‘हरिपाठ’ होय. जीवनातील अनेक मूल्यांची सुंदर गुंफण हरिपाठात पाहायला मिळते. आधुनिक काळातही मानवी जीवनासाठी ‘हरिपाठ’ मार्गदर्शक ठरत आहे. वैज्ञानिक, मानसशास्त्रीय, व्याकरण अशा विविध दृष्टिकोनातून हरिपाठाकडे लक्ष वेधून घेण्याचा लेखिकेचा प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले
डॉ. पाडेकर यांनी ‘प्रबंधाकडून पुस्तकाकडे’ झालेल्या लेखनप्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. ग्रामीण पार्श्‍वभूमी व प्रतिकूल परिस्थितीतही लता व भरत पाडेकर यांनी पीएच.डीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, शैक्षणिक व सामाजिक सेवेचा वसा घेतल्याबद्दल कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी या दांपत्याचे अभिनंदन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी हभप बाजीराव महाराज चंदिले, डॉ. आरती दातार, डॉ. श्रीपाद भट, श्री. वा. कुलकर्णी, पल्लवी गजरमल, जयश्री पाटील व सुरेखा पाटणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे यांनी केले; तर डॉ. भरत पाडेकर यांनी आभार मानले.