वाराणसीत मोदींचा मेगा रोड शो

0

वाराणसी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस मोदी वाराणसीमध्ये असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वाराणसीत तब्बल सात किलोमीटरच्या मार्गावर मेगा रोड शो केला. बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटजवळून निघालेल्या या भव्य रोड शोमध्ये मोदी सहभागी झाले होते.

वाराणसीमध्ये आल्यानंतर मोदी यांनी पंडीत मदन मोहन मालवीय यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. रोड शोमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. रोड शोनंतर मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर आणि कालभैरव मंदिरात जाऊन पूजा केली. यानंतर काशी विद्यापीठाच्या मैदानावर त्यांची सभा झाली. रविवारी मोदी वाराणसीतील टाऊनहॉल मैदानावर दोन हजार विशेष निमंत्रितांशी चर्चा करतील. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणसीतील रोहानियामध्ये मोदींची सभा होणार आहे. काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही वाराणसीत तळ ठोकला आहे.