मुंबई : एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठान यांनी १५ रोजी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले होते. वारिस पठान यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. भाजपाचे नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना १०० मावळे अडचणीत आणतील, असा टोला लगावला आहे.
आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.
मात्र, वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असून, थेट माफी मागितलेली नाही. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असा टोला मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लगावला. तर वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. मुनगंटीवार यांच्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.