वाशिम। औरंगाबाद येथील बाबा पेट्रोल पंपासमोर 6 जुलैला दुपारी 12 वाजता अचानक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस वाहकाने 45 वर्षीय महिलेला खाली उतरवले. झालेल्या प्रकाराने महिला गोंधळली. मात्र कुणीही मदतीला धावून आले नाही. तेव्हा तिथूनच कामावर जाणार्या मुस्लिम व्यक्तीने मजुरीचा खाडा करत स्व-खर्चाने त्या महिलेला तिच्या गावात सुखरूप आणून सोडले. ही घटना हिंदू-मुस्लिमांच्या मनात विष पेरणार्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.
शेख चाँदभाईंनी केली मदत
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावातील काही महिला व पुरुष मंडळी खाजगी वाहनाने पंढरपूर वारीत विठ्ठलाच्या दर्शनालास गेले होते. गावातील महिला पुष्पाबाई बळीराम सानप (वय 45 वर्ष) यांची ताटातूट झाली. गाडीतील पुरुषांनी पुष्पाबाईंचा बराच शोध घेतला पण पुष्पाबाई लाखोंच्या गर्दीत हरवल्या. पुष्पाबाई पंढरपूरवरून चुकीच्या गाडीत बसून अहमदनगरला पोहचल्या. नगरवरून औरंगाबादला आल्या. वाशिम जिल्ह्यातील मालेगावला जायचे असल्याने मालेगाव नावारून पुन्हा त्यांचा गोंधळ उडाला. त्या धुळे मालेगाव गाडीत बसल्या. येथेही त्या पुन्हा चुकल्या. त्याच वेळी पेडगाव येथून कामावर जात असलेले शेख चाँदभाई शेख करीमभाई यांनी पुष्पाबाईंची विचारपूस केली. त्यानंतर शेख चाँदभाई यांनी मजुरीचा खाडा करून पुष्पाबाईंना बस मध्ये बसवले. बसचे तिकिट काढले आणि सायंकाळी 7 वाजता शेख चाँदभाई यांनी राजुरा गावी त्यांना सुखरूप आणून सोडले.