पुणे : जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पंढरीच्या वारीनिमित्त ’आषाढी वारी 2018’ हे अॅप तयार केले असून, पांडुरंगाच्या भक्तगणांना याद्वारे पंढरपूरच्या लाइव्ह दर्शनाची सुविधा मिळणार आहे. वारीमार्गात पालख्या कोठे आहेत, याची माहिती; तसेच हरविलेल्या व्यक्तींबाबत माहितीही दिली जाणार आहे.
‘वारीच्या काळात वारकर्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबरच विविध प्रकारची माहिती या अॅपद्वारे देण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेसह आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना महत्त्वाचे संदेश यावरून दिले जातील. पंढरपूर येथून विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभार्याचे थेट प्रक्षेपण या अॅपद्वारे केले जाणार आहे. पालखी सोहळ्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती पोलिस विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीवरून देण्यात येणार आहे, असे उपायुक्त उदय भोसले यांनी सांगितले.
या अॅपमध्ये पालखी मार्गात विसाव्याचे ठिकाण, पाणी पुरवठ्याचे ठिकाण, समन्वय कक्ष, गॅस आणि केरोसिन मिळण्याचे ठिकाण, टँकरची सुविधा, शौचालय आदी ठिकाणे यांची जीपीएस लोकेशन देण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले. या अॅपवर पालख्यांचा मार्ग, वैद्यकीय सेवा, अन्नधान्य पुरवठा व वितरण, विद्युत सेवा, आपत्कालीन सेवा याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोबाइलवर ’प्ले स्टोअर’मधून ‘आषाढी वारी 2018’ या नावाचे अॅप डाउनलोड केल्यानंतर या सुविधा मिळू शकतील.
पालखी कालावधीत भाविकांचा समुदाय जास्त असतो. संपर्कासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, नेटवर्क अडचणीमुळे वारकर्यांची गैरसोय होते. त्यामुळे पालखी मार्गस्थ होत असलेल्या भागातील भ्रमणध्वनी जंक्शन क्षमता वाढविण्यासाठी आणि मोबाइल टॉवर उभारण्याबाबत मोबाइल कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.