वार्ड क्र. 3,36 चा साफसफाईचा ठेका रद्द

0

जळगाव । शहरातील प्रभाग क्र. 36 मधील साफसफाई मक्तेदार सहजिवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेकडून प्रभागात साफसफाई केली जात नसल्याच्या तक्रारी वारंवार तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, आरोग्याधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. तसेच मक्तेदार व त्यांचे हितचिंतक मात्र या तक्रारींमुळे संबंधित संस्था ही कारवाईत ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची लक्षणे दिसताच संस्थेच्या संबंधित व्यक्तींनी आम्हाला आमिषे दाखवून तोडीपाणी करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी रविवारी पत्रपरीषदेत केला होता. महापौर लढ्ढा यांनी याप्रकरणी गठीत चौकशीसमितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याच्या सूचना उपायुक्तांना पत्राद्वारे केल्या आहेत. दरम्यान, वार्ड क्र. 3 व 36 मधील ठेका रद्द केल्याची माहिती आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.

अटी, शर्तींचा केला भंग
येथील महापालिका वार्ड क्र. 3 व 36 मधील दैनंदिन रस्ते, गटारी सफाई व कचरा वाहतुक करण्याच्या कामाबाबत करण्यात आलेल्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे परिश्रम महिला बचत गट व सहजीवन स्वयंरोजगार सेवासह संस्था मर्यादित यांचा ठेका 11 जुलैपासून रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे. वार्ड क्र. 3 मधील महापालिकेने परिश्रम महिला बचत गट यांचेसोबत करार केला होता. परंतु त्यांनी साफसफाई करीता कमी प्रमाणात कामगार पुरविणे व घंटागाडीवर ओला व सुका कचरा फलक न लावणे आदी अटी शर्तींचा भंग केला. तसेच याबाबत स्थानिक नगरसेवकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने परिश्रम महिला बचत गटाचा ठेका रद्द करण्यात आला. तसेच वार्ड क्र. 36 मधील परिसरातील साफसफाईचा ठेका सहजीवन स्वयंरोजगार सेवासह संस्था मर्यादित यांना देण्यात आला होता. त्यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा केल्याचे हजेरी पगार मस्टर सादर न करणे, घंटागाडी एक दिवसाआड पाठवणे याबरोबरच करारातील अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांचाही ठेका 11 जुलैपासून रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त श्री. निंबाळकर यांनी दिली आहे.