वार्तांकन करत असताना पत्रकाराला मारहाण; 4 भाजपा नेत्यांना अटक

0

रायपूर : वार्तांकन करत असताना पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या चार स्थानिक नेत्यांना शनिवारी रात्री उशीरा छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. रायपूरमधील एका वेबसाईटचे पत्रकार भाजपाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे वार्तांकन करत असताना भाजपाच्या कार्यालयातच शनिवारी संध्याकाळी त्यांना मारहाण करण्यात आली होती. भाजपाचे रायपूर जिल्हाध्यक्ष राजीव अग्रवाल आणि स्थानिक नेते विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि दिना डोंगरे अशी अटक झालेल्यांची नावं आहेत. पत्रकार सुमन पांडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भाजपाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी पत्रकार पांडे गेले होते. या बैठकीला भाजपाचे अनेक स्थानिक नेत्यासह रायपूर भाजपाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल उपस्थित होते. बैठक सुरू असताना अचानक भाजपाच्या नेत्यांमध्ये आपापसांत किरकोळ वाद झाला. झालेला प्रकार पांडे हे मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत असतानाच अग्रवाल आणि त्रिवेदी त्यांच्याजवळ गेले आणि व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितला. पण पांडेंनी त्यासाठी नकार दिला असता अग्रवाल यांनी पांडेंना मारहाण करण्याास सुरूवात केली. इतरांनी माझ्याकडून मोबाइल बळजबरी हिसकावून घेवून त्यामधून व्हिडीओ डीलिट केला, त्यानंतरही जवळपास 20 मिनिट पांडे यांना त्याच रुममध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर पत्रकार पांडे यांनी इतर पत्रकारांसह भाजपाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. पांडे यांनी घडलेल्या प्रकाराची लेखी पोलीस तक्रार केली. अखेर या प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या चार जणांना अटक केली आहे. मारहाणीत पांडे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.