वार्ताहर मारहाण प्रकरणाची चौकशी करा : आ. नीलम गोर्‍हे

0

पुणे । सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी मुजोरपणाने वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन त्यांनी रविवारी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले आहे.मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केली होती.

वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी भुकेले यांना ‘तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो’ अशी दमबाजी केली. रेकॉर्डिंग काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. भुकेले यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे मोरे यांचा पारा चढला. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी भुकेले यांना पोलिस व्हॅनमध्येच मारहाण केली. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला. ही घटना गंभीर असल्याने याबाबत मोरे यांची चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. नीलम गो-हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांनी याबाबत माहिती दिली असून या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पत्रकारांना सौहार्दपूर्ण वागणूक देण्याबाबतच्या सूचना पोलिस यंत्रणेला देण्यात याव्यात, असेही या निवेदनात म्हटले आहे.