वार्षिक योजनेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करा

0

धुळे : जिल्हा वार्षिक योजना 2017- 2018 करिताचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागांनी तत्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी जिल्हा नियोजन समितीची पूर्व तयारीची बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, जिल्हा नियोजन अधिकारी आर. एम. पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी एल.आर. राठोड, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त के. जी. बागूल, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी केले मार्गदर्शन
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी मंजूर निधी वेळेत खर्च केला पाहिजे. त्याचे नियोजन आतापासूनच करावे. मंजूर निधीतून करावयाच्या कामांना तत्काळ प्रशासकीय मंजुरी घ्यावी. त्यासाठीचे प्रस्ताव विभागप्रमुखांनी सादर केले पाहिजेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017चा मार्च 2017 अखेरचा खर्च आढावा, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना, अनुसूचित जाती उपयोजना, सर्वसाधारण योजना, जलयुक्त शिवार अभियान, नावीण्यपूर्ण योजना, कृषीसह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करावीत, असेही त्यांनी निर्देश दिले.