वार्षिक योजनेत जिल्ह्यासाठी 51 कोटींची अतिरिक्त मागणी

0

जिल्ह्याचा 292 कोटीचा वार्षिक आराखडा मंजुर
अंगणवाडीसह सीसीटीव्हीसाठी पत्र

जळगाव । जिल्ह्यासाठी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी दिलेल्या 292 कोटी 5 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण काल पुणे येथे करण्यात आले असुन त्यात 51 कोटींची अतिरिक्त मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. पुणे येथे काल जिल्हा वार्षिक योजना (सर्व साधारण) 2019-20 चा सर्वसाधारण प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्ह्याच्या 292 कोटी 5 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री ना. पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वला पाटील, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. सादरीकरणात 2018-19 साठी मंजूर तरतूद 301 कोटीची असताना पुढील आर्थिक वर्ष 2019-20 साठी मात्र आर्थिक मर्यादा 292 कोटीची कळविण्यात आली आहे. या फरकाची रक्कम 9 कोटी 73 लाख कोटी प्राधान्याने मंजूर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गॅप फंडीगसाठी 24 कोटीची व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 51 कोटींची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली.

अंगणवाडी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना
जिल्हा परिषदेचे सीईओंना जिल्हाधिकार्‍यांनी आज पत्र दिले. त्यात म्हटले आहे,की जिल्हा परिषदेने अंगणवाडी बांधकामासाठी 14 कोटींची मागणी केली आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीने 4 कोटींची नियतव्यय प्रस्तावित केला आहे. मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन वित्त व नियोजन मंत्र्यांनी दिले. यामुळे जिल्ह्यातील 7 तालुक्यांत अंगणवाडी बांधकामाचा प्रस्ताव अंदाजीत किंमतीसह सादर करावा.

पोलीस अधीक्षकांकडुनही प्रस्ताव मागविला
बैठकीत पोलिसांना सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याअनुषंगांना पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनाही जिल्हाधिकार्‍यांनी पत्र पाठवून जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची गरज असेल त्याठिकाणचा प्रस्ताव अंदाजीत किमतीसह सादर करण्याचे पत्र देण्यात आले आहे.