वालचंदनगर महावितरणचा अजब कारभार

0

स्वयंघोषित लोडशेडिंग तेही ३ तासांचे; ८-१० वेळा वीजपुरवठा होतो खंडीत, नागरिकांना केवळ आश्‍वासनेच

बारामती । वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील महावितरणच्या कारभाराला नागरिक अक्षरक्षः कंटाळलेले आहेत. चोवीस तासात जवळपास ८ ते १० वेळा सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असतो यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे येथे ३-३ तासांचे स्वयंघोषित वीजेचे लोडशेडिंग केले जाते. वालचंदनगर येथे गेल्या दीड महिन्यापासून अनियमितपणे वीजपुरवठा होत आहे. याबाबत महावितरणच्या येथील शाखा कार्यालयास व्यापार्‍यांनी व नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे व तोंडी समक्ष निवेदने दिलेली आहेत. यावेळी नागरिकांना व व्यापार्‍यांना केवळ आश्‍वासने देण्यात आली.

दुकानांना फटका
वीजपुरवठ्याच्या या अनियमित पणामुळे दुकानांवर चांगलाच परिणाम होत आहे. पिठाणी गिरणी, इस्त्री, आइस्क्रीम पार्लर, स्वीट होम यांसारख्या वीजेची सातत्याने गरज असणार्‍या दुकानांना याचा चांगलाच फटका बसत आहे. येथील कापाटी हे वीजबील नियमितपणे भरत असतात. तरीदेखील हा त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतपंपाची थकबाकी मोठ्या प्रमाणात
वालचंदनगर येथील ग्रेडर हा तीन क्रमाकांचा आहे. या ग्रेडरवर वालचंदनगर येथील व्यापारी वसाहत आजूबाजूच्या परिसरात शेतकरी आहेत. येथील शेतपंपाची थकबाकी असल्यामुळे हा ग्रेडर बी वरून ई कडे दर्जा घसरत असल्याचे खात्रीपूर्वक सांगण्यात येत आहे. शेतपंपाची थकबाकी ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा प्रश्‍न अधिकच गुंतागुंतीचा बनला जाणार आहे. अशातच थकबाकी अधिक असल्यास वीजेचे लोडशेडिंग केले जाणार असल्याचे महावितरणने नुकतेच जाहीर केले आहे. साहजिकच यामुळे येथील दुकानदारांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.

अधिकार्‍याची भेटण्यास टाळाटाळ
याबाबत महावितरणचे शाखा अभियंता काळे यांना विचारले असता त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. या कार्यालयात काळे हे फारच कमी प्रमाणात उपस्थित असतात. काळे यांना भेटावयास गेले असता मिटिंगला गेल्याचे सांगितले जाते.

९० छोटे-मोठे व्यावसायिक
वालचंदनगर येथील बाजारपेठेमध्ये जवळपास ९०च्या आसपास छोट-मोठे व्यावसायिक आहे. या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र ग्रेडर असावा व तशी व्यवस्था केली जावी अशी मागणी येथील दुकानदारांची आहे. याबाबत येथील दुकानदार लवकरच बारामती येथील वीज परिवहन मंडळ कार्यालयास निवेदन देणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले.