दोन दिवसानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव- कंपनीत काम करुनही सहा महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने घरभाड्यासह घरखर्च भागवायचा कसा? या नैराश्यातून अक्षय वामन कोळी वय 20 या रा. वाल्मिक नगर या तरुणाने विषप्राशन केल्याची घटना 18 रोजी दुपारी घडली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 12.40 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी एका कंपनीत दोन वर्षापासून अक्षय हा शिपाई म्हणून कामाला होता. या कंपनीत चार ते पाच महिन्यांपासून पगार न झाल्याने घरभाड्यासह घरखर्च भागवायचा कसा ? या नैराश्यातून अक्षय याने 18 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विष प्राशन केले. अक्षयची भाची रितू हिने ही घटना बघितली. तिने हा प्रकार शेजारीत राहत असलेल्या मेव्हण्यांचा भाऊ विनोद विश्वनाथ साळुंखे यांना सांगितला. त्यानुसार साळुंखे यांनी कुटुंबियांसह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांपासून त्याची मृत्यूची सुरु असलेली त्याची झुंज अपयशी ठरली. 19 रोजी शनिवारी पहाटे 12.40 वाजता उपचार सुरु असतांना अक्षयचा मृत्यू झाला. शनिपेठ पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. शोकाकूल वातावरणात त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
घरचा कर्ता पुरुष गेला
अक्षयचे वडील कंपनीत होते. अक्षय 4 वर्षांचा असतांना त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. दोन वर्षापूर्वीच 18 वर्ष झाल्यानंतर वडीलांच्या जागेवर अक्षयला कंपनीत घेण्यात आले होेते. अक्षयच्या पश्चात आई सिंधुबाई, प्रतिभा, सुवर्णा व वैशाली अशा तीन बहिणी असा परिवार आहे. वैशालीचा घटस्फोट झाला असून दोन वर्षापासूनही तीही माहेरी वाल्मिकनगरात राहत होती. आईसह बहिणीची जबाबदारी अक्षयवर होती. कंपनीत सहा महिन्यांपासून पगार नाही, त्यातही घरखर्च भागवायचा कसा, या विवंचनेत त्याने विषप्राशन केले, अशी माहिती अक्षयच्या नातेवाईकांनी दिली. घरचा कर्ता पुरुष हरविल्याने आईसह बहिणींनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.