मुंबई । अहमदनगरमध्ये शिवसेना पदाधिकार्यांचे झालेले दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसेवरून शिवसेनेने भाजपला जोरदार फटकारले आहे. ‘भाजपने 2014 पासून वाल्याचा शुद्ध वाल्मिकी करण्याचा जोडधंदा सुरू केला आहे. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल,’ असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
दैनिक ’सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी नगरच्या हत्याकांडावरून भाजपला फैलावर घेतले आहे. ’नगरचे हत्याकांड हा महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. खुनाचे शिंतोडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अंगावर उडाले. अजित पवार व धनंजय मुंडे यांचे ‘हल्लाबोल’नाट्य महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्या दोन आमदारांनी भाजप आमदारांच्या मदतीने केडगावात ‘हल्लाबोल’ केले, दोन निरपराध माणसे मरण पावली. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही. नेभळट सरकार व पुचाट कायदा काय करतोय ते पाहू. नाहीतर नगरच्या पर्यटन केंद्रातील उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची उत्तर पूजा वाघांचे पंजे करतील,’ असा इशारा उद्धव यांनी दिला आहे.