रावेत : वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल 6 एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी (दि. 26) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन अग्निशामक विभागाचे बंब आणि नागरिकांनी मिळून लागलेली आग विझवली. वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. 47मध्ये असलेल्या हॉटेल रानमळाशेजारी असणार्या भागातील सुरेश चिंचवडे यांचा अडीच एकर, बाळासाहेब चिंचवडे यांचा अडीच एकर, हनुमंत चिंचवडे यांचा एक एकर असा एकूण सहा एकरच्या आसपास ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जोराचा वारा असल्याने लागलेली आग सर्वत्र पसरली. ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात सर्वत्र पसरलेला ठिबक सिंचन आगीत जळून खाक झाल्याने जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. ऊसाच्या सुकलेल्या पाचोळ्यांमुळे ही आग क्षणातच वाढत गेली. शेजारी असलेल्या ऊसांमध्ये ही आग पसरत गेली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच ब प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिंचवडे, संकेत चिंचवडे, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर आदी सह कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप पाहता ती वाढून इतरत्र पसरू नये या करिता सर्वांनी तत्काळ अग्निशामक यंत्रणा येईपर्यंत उपलब्ध असलेल्या पाण्यानी आग विजविण्याचा प्रयत्न केला.