रावेत : शहरातील वाल्हेकरवाडी आणि चिंचवडे नगर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी या भागात पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे केली आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर परिसरात जवळपास पन्नास हजार लोकसंख्या आहे. अनेक वेळा चोरी, भांडणे, अपघात, मुली व महिलांची छेडछाड, दागिने हिसकवणे व वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या आहेत अशा वेळी नागरिकांना तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात जावे लागते. वाल्हेकरवाडी ते चिंचवड पोलीस स्टेशन अंतर अधिक असल्यामुळे तक्रार दारास तक्रार करण्यास विलंब होतो.
चिंचवड पोलीस स्टेशन अंकित वाल्हेकरवाडी येथे पोलोस चौकी होणे अत्यंत आवश्यक आहे सर्व प्रकारची व्यावसायिक दुकाने या परिसरात आहेत. गेल्या काही वर्षात या परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दुचाकी व भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. लवकरच परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त गणेश शिंदे यांनी यावेळी दिले.