पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी येथील राजवाडा लॉजच्या खोलीत एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. नयन सुबोध शिंदे (वय 19, रा. पोलीस लाईन, वाकड) असे त्याचे नाव आहे. याविषयी हॉटेलचे व्यवस्थापक दिवाकर भास्कर शेट्टी (वय 28, रा. मस्केवस्ती, रावेत) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात खबर दिली.
नयन याने 13 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता हॉटेल राजवाडा येथील खोली क्रमांक 202 बुक केली. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मॅनेजर स्वतः तेथे चौकशीसाठी गेले असता दरवाजा वाजवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हॉटेल व्यवस्थापनाने खोलीच्या मागच्या बाजूच्या खिडकीमधून पाहिले असता नयनने गळफास घेलत्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नयन याचे वडिलांचे निधन झाले आहे.त्यामुळे तो आई, बहीणीसह त्याच्या मामाकडे वाकड पोलीस लाईन येथे रहात होता. मामा हिंजवडी वाहतूक शाखेमध्ये पोलीस आहेत. तर नयन हॉटेलमध्ये काम करत होता. 13 ऑगस्ट रोजी तो घरून भांडण करुन या लॉजमध्ये राहण्यास आला. तेथे त्याने तीन ते चार दिवस वास्तव्य करुन शेवटी आत्महत्या केली. घटनास्थळाची देहुरोड पोलिसांनी पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.