वाल्हे । वाल्हे गावाच्या विभाजनानंतर प्रथमच नवीन वागदरवाडी, सुकलवाडी, अडचीवाडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेचा कार्यक्रम पार पडला. नव्याने वॉर्ड रचना असल्याने काही किरकोळ वाद वगळता वार्ड रचना आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी प्रती गाव विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या.
सुकलवाडी 9 सदस्य
सुकलवाडी गावात 1 हजार 632 मतदार असून ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य राहणार आहेत. यात सुकलावाडी, मुकदमवाडी, अम्बाजीचीवाडी, गायकवाडवाडी यांचा समावेश आहे. येथील माजी सरपंच दत्तात्रय पवार. हनुमंत पवार, राहुल यादव, धनंजय पवार, दादा पवार, मंडलाधिकारी एस. एस. उचळे, तलाठी सतीश काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.
मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षण
वार्ड एकमध्ये पाठणवस्ती, चव्हाणवस्ती, दत्तमंदिर ते नाथ मंदिर हा भाग असून यात सर्वसाधारण पुरुष, महिला व मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडले आहे. तर वार्ड दोनमध्ये गावठाण उत्तर बाजूने सुकलवाडी ते मुकादमवाडी हा असून यात सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण दोन महिला असे आरक्षण आहे. वार्ड तीनमध्ये सर्वसाधारण पुरुष, महिला व मागासांचा प्रवर्ग महिला असे आरक्षण पडले आहे.
अडचीवाडी येथे तीन वॉर्ड
अडचीवाडी येथे वाल्ह्याच्या सरपंच कल्पना गोळे, ग्रामसेवक बी. एस. गाताडे, मंडलाधिकारी भारत भिसे, गावकामगार तलाठी प्रमोद झुरुंगे, माजी सरपंच समदास भुजबळ, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पवार आदी उपस्थित होते. येथील मतदार संख्या 1 हजार 565 असून तीन वॉर्ड करण्यात आले आहेत. तर सदस्य संख्या 9 आहे. वॉर्ड रचनेत वॉर्ड नंबर एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण आहे. वॉर्ड दोनमध्ये मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसह सर्वसाधारण असे आरक्षण आहे. वॉर्ड तीन सर्वसाधारण दोन महिला व सर्वसाधारण असे आरक्षित आहेत. अडचीवाडी गावात पतरमळा मधला मळा व वरचामळा यांचा समावेश आहे.
वागदरवाडीत 1 हजार 542 मतदार
वागदरवाडी नव्याने ग्रामपंचायतीमध्ये लेखनिक डी. एम. सोनावणे, वाल्ह्याचे विद्यमान उपसरपंच पोपट पवार, सुनील पवार, नाना दाते, भास्कर भुजबळ, दत्ता पवार, अजित शिंदे, प्रवीण भुजबळ, प्रकाश पवार, शरद कदम यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या गावात 1 हजार 542 मतदार असून नऊ सदस्य आहेत. वार्ड एकमध्ये गावठाण, पवारआळी, भुजबळआळी असा समावेश आहे. तर मागासप्रवर्ग महिला सर्वसाधारण, महिला सर्वसाधारण असे आरक्षण आहे. तर वार्ड दोनमध्ये कदमआळी, शिंदेआळी, दातेवाडी, वडाचीवाडी, पवारवाडी, झापवस्ती यांचा समावेश आहे. यामध्ये मागासप्रवर्ग पुरुष व सर्वसाधारण महिला दोन आरक्षण आहे. वार्ड तीनमध्ये बहिर्जीचीवाडी, मोरूजिचीवाडी, बाळाजिचीवाडी यांचा समावेश आहे. यात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष दोन असे आरक्षण पडले आहे.