इंदापूर : अवैध वाळू उपसा करणार्यांवर महसून विभागाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. दौंड तालुक्यातील खानवटे, इंदापूर तालुक्यातील डिकसळ आणि करमाळा तालुक्यातील कात्रज येथील भीमा नदीपात्रात वाळूचा उपसा करणार्या बोटींवर धडक कारवाई करण्यात आली. तीनही तालुक्यांच्या संयुक्त पथकाने दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 38 वाळूउपशाच्या फायबर बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उडविल्या. उजनी पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा होत असल्याची माहिती गुरुवारी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, दौंड तहसीलदार बालाजी सोमवंशी, करमाळ्याच्या तहसीलदारांना मिळाली होती. त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचार्यांना घेऊन स्वत: पाण्यात उतरून दिवसभर धडक कारवाई केली. राज्यातील सर्वांत मोठी ही कारवाई आहे. या कारवाईत बालाजी सोमवंशी, सोनाली मेटकरी, सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार यांच्यासह पोलीस केशव चौधर, अविनाश कांबळे यांनी सहभाग घेतला होता. उजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाचा फौजफाटा घेऊन तहसीलदार येणार असल्याची खबर वाळूमाफियांना लागताच, वाळू उपसा करणारे चोरटे तहसीलदारांची गाडी पाहून पसार झाले. उजनीच्या नदीपात्रात ज्या 13 फायबरच्या बोटी आणि 13 सेक्शन अशा 26 वाळूउपसा करणार्या बोटी आढळून आल्या, त्यावर स्वत: तहसीलदारांनी महसूल कर्मचार्यांच्या मदतीने जिलेटिनचा स्फोट करून त्या उद्धवस्त केल्या. या कारवाईमुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा करणार्या माफियांचे धाबे दणालले आहेत. या कारवाईत सुमारे 1 कोटी रुपयांचा फटका वाळूमाफियांना बसला आहे. ही कारवाई इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावी सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे वाळूमाफियांचे फावले होते. शासकीय यंत्रणा निवडणूक कामकाजात व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस चालू केला होता. त्यामुळे संयुक्त कारवाई करीत वाळूमाफियांचे कंबरडे मोडण्याची कारवाई करण्यात आली आणि वाळू- माफियांनी असे कृत्य केल्यास त्यांना शासकीय नियमनुसार दंड ठोठावून तुरुंगाचीही हवा खावी लागेल, उजनीच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपाशाची बोट सोडली, तर याद राखा, असा सज्जड दम तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वाळूमाफियांना दिला आहे.