महसूल विभागाने केली चार वाहने जप्त : प्रातांधिकार्यांची धडक कारवाई
यवत । दौंड तालुक्यातील कासुर्डी गावालगत असणार्या तलावात अवैधरीत्या वाळू उपसा करणार्या 6 वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. यामध्ये चार वाहने जप्त करण्यात आली तर दोन वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. या कारवाईत दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी संजय असवले सहभागी झाले होते. जप्त केलेले दोन ट्रक, एक जेसीबी, ट्रॅक्टर यवत येथील शासकीय विश्रामगृहात लावण्यात आली आहेत. या धडक कारवाईमुळे गाव पुढार्यांचेही धाबे दणाणले आहेत.
मागील काही वर्षांपासून कासुर्डी येथील तलाव, ओढे, नाले आदी ठिकाणी अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. येथे गावात कुल-थोरात यांचे प्रबळ गट कार्यरत आहेत. कुल गटाच्या सदस्यांनी या अवैध उपसाला ग्रामपंचायतच जबाबदार असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली होती.
कठोर कारवाईची मागणी
ग्रामपंचायतीच्या सभेत गावातील पर्यावरणाच्या र्हासाला महसूल विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत ते वाळू चोरांना पाठिशी घालत असल्याचा आरोप सरपंच बापु ठोंबरे यांनी केला होता. या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा ठराव संमत केला होता. तशा प्रकारची गुन्हा दाखल करण्याची मागणीचा तक्रारी अर्ज व यवत पोलिसांना दिला होता. आता हा अवैध वाळू उपसा जबाबदार गाव पुढारीच करत असल्याची गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता महसूल विभागाने गाव पुढार्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.