वाळूची तस्करी करणारी टोळी सक्रिय

0

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर जास्त वाळूची चोरी
नंदुरबार । महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सीमेवर असलेल्या वाका चार रस्ता भागात वाळू तस्करांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून त्याचे लोण आता नंदुरबार शहरापर्यंत पोहोचले आहे. बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारी चार डंपर पकडून सहाय्यक जिल्हाधिकारी वांमती सी, यांनी केलेल्या धडक कारवाईतुन दिसून येत आहे. नजीकच्या गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार शहरासह जिल्ह्यात व जिल्हा बाहेर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्री होताना दिसत आहे. वाळूने भरलेली अशीच चार वाहने नंदुबार शहरातील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या सुमारास पकडण्यात आली आहेत.

सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी वामती सी. यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. वाका चार रस्ता येथून वाळू ने भरलेली ही वाहने नंदुरबार ला येत असल्याची खबर त्यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सोमवारी सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ रात्री 9 वाजेच्या सुमारास ही वाहने अडवून चौकशी केली. यावेळी या सर्वच वाहनांकडे वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. शिवाय त्यात असलेली वाळू चोरीची आढळून आली. तेव्हा त्यांनी ती वाहने तहसील कार्यालयात लावण्याची सूचना केल्यावर त्यातील दोन वाहने पळविण्याचा प्रकार घडला, पाहता पाहता त्या ठिकाणी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेले 30 ते 40 जणांचा जमाव जमला, त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव आणून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, याबाबत दिलीप वाणी या महसूल कर्मचाऱ्याने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज शेख, सचिन सुकलाल गावित, किसन भगवान ठाकरे यांच्यासह वाहन मालक व 30 लोकांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.