खाकीच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम ; डोक्यात हेल्मेट असल्याने दुर्घटना टळली.
जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एका भरधाव वेगाने जाणाजया वाळूच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास तरसोदजवळ घडली. या अपघातात संजय कृष्णा कोळंबे (वय 50, रा. गुजराल पेट्रोलपंप परिसर, जळगाव) यांचे दोन्हीही पाय निकामी झाले आहे. डोक्यात हेल्मेट असल्याने दुर्घटना टळली. अपघातानंतर कोळंबे हे महामार्गावर विव्हळत पडले होते. त्याच्या सोबतचे त्यांचे शालक मदतीसाठी ये-जा करणार्या वाहनधारकांना विनवण्या करीत होते, मात्र कोणीच थांबले नाही. यादरम्यान भुसावळून आरोपींना कारागृहात घेवून जाणार्या पोलिसांनी गाडी थांबवली. तत्परता दाखवित कोळंबे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. खाकीच्या कर्तव्यनिष्ठेला अनेकांनी यावेळी सलाम ठोकला तर दुसरीकडे मदतीऐवजी मोबाईलमध्ये शुटींग करणार्यांमुळे माणुसकी संपली की काय असाही प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला.
डंपर गेल्याने दोघा पायांचा झाला चेंदामेंदा
गुजराल पेट्रोलपंप परिसरात संजय कोळंबे कुटुंबासह वास्तव्यास आहे. फैजपूर येथील नातेवाईकाकडे शुक्रवारी विवाह समारंभ होता. या विवाह सोहळ्यासाठी कोळंबे यांचे पुणे येथील शालक महेंद्र भोळे हे सुध्दा जळगावला आले होते. कोळंबे व भोळे हे दोघे दुचाकीने शुक्रवारी सकाळी या विवाह सोहळ्यासाठी फैजपूरला गेल होते. तेथून जळगावकडे परतत असतांना तरसोद फाटा ते दूरदर्शन टॉवर दरम्यान महामार्गावर कोळंबे यांनी धुर नियंत्रण केंद्रावर तपासणीसाठी गाडी थांबविली. रस्त्याच्या विरुध्द बाजनू असल्याने भोळे दुचाकीवरुन खाली उतरले तर कोळंबे दुचाकीसह रस्ता पार करत असतांना भुसावळकडे भरधाव वेगाने अवैध वाळूने भरलेल्या डंपरने (क्रमांक एमएच 19, सीवाय – 3124) दुचाकी धडक दिली. पडंपरने दुचाकीला फरफटत नेले. त्याच वेळी कोळंबे यांच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने पायांचा चेंदामेंदा झाला होता. डोक्यात हेल्मेट असल्याने दुर्घटना टळली.
वाहनातून पोलिसांनी तत्काळ हलविले रुग्णालयात
अपघातानंतर जखमी जागेवर विव्हळत असताना येणारे-जाणारे कोणीही थांबत नव्हते. त्याच वेळी भुसावळ न्यायालयात तारखेवर आरोपींना हजर करुन सहायक फौजदार हेमचंद्र झोपे, पोहेकॉ सुनील पाटील, रवींद्र महाले, चालक राजेंद्र पवार पुन्हा जळगावला कारागृहात घेऊन येत होते. विव्हळत पडलेल्या कोळंबेंना कुठलीही वेळ न दवडता कर्मचार्यांनी शासकीय वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यामुळे कोळंबे यांच्यावर तत्काळ उपचार होवू शकले. व त्यांचा जीव वाचला. कोळंबे यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचारादरम्यानही वेदना असह्य होत असल्याने त्यांनी गायत्री मंत्राचा अखंड जाप सुरू ठेवला होता.
वाळू उपशास बंदी वाळू वाहतूक कशी
वाळू उपशास बंदी असताना अद्यापही वाळू वाहतूक सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात शुक्रवारी वाळू वाहतूक करणार्याच डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ही वाळू आली कोठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भुसावळ येथे खाजगी बांधकामासाठी ही वाळू नेली जात होती, असे डंपरच्या चालकानेच सांगितले. त्यामुळे वाळू वाहतुकीकडे का डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जखमीसह अपघातासह कारणीभूत डंपरचालकाही पोलीस कर्मचार्यांनी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात पोलीस चौकीत कार्यरत पोलिसांच्या स्वाधीन केले.