खेडी शिवारात गिरणानदीपात्रातील घटना
तीन कर्मचारी किरकोळ जखमी
ट्रॅक्टर जप्त करीत तालुका पोलिसात गुन्हा
जळगाव : तालुक्यातील खेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात अवैध वाळूचे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या आरसीपी प्लाटूनवर 10 ते 15 वाळूमाफियांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. या दगडफेकीत योगेश पाटील, तौसिफ पठाण व ज्ञानेश्वर चव्हाण तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून ट्रॅक्टर जप्त करुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वाळूमाफियांची मुजोरी पुन्हा समोर आली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना खेडी शिवारातील नदीपात्रात अवैध रित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या आदेशानुसार आरसीपीच्या 10 ते 15 कर्मचार्यानी तत्काळ खेडी गिरणा नदीचे पात्र गाठले.
वाळूमाफियांकडून अंधाधुंद दगडफेक
पथकाने घटनास्थळ गाठल्यावर त्यांना नदीपात्रात ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीमध्ये 15 जण वाळू भरत असल्याचे दिसले. पथक काही करतील तोच ट्रॅक्टरवरील वाळूमाफियांनी अंधाराचा फायदा घेत कर्मचार्यांवर अंधाधुंद दगडफेक करण्यात सुरुवात केली. व काही वेळाने वाळूमाफिया ट्रॅक्टरसोडून पसार झाले. पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात जमा केली. दगडफेकीत तीन कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
विना नंबरचे ट्रक्टर, ट्रॉलीवरील नंंबर खोडलेला
वाळू वाहून नेण्यासाठी वाळू माफिये वेगवेगळी शक्कल लढविल्याचे अनेक वेळा केलेल्या कारवाईतून समोर आले. या कारवाईतही पोलिसांनी जप्त केलेले ट्रॅक्टरचे विना नंबर तर ट्रॉलीवरील नंबर खोडण्यात आलेले आहेत. याप्रकरणी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश मन्साराम वाघ या कर्मचार्याच्या फिर्यादीवरुन 15 अज्ञात वाळूमाफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच लाख रुपये किंमतीचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलीस कठोर कारवाई करणार का?
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र तरीही वाळूमाफियांची मुजोरी सुरूच आहे. रोज कारवाया होत असल्या तरी वाळू वाहतूक थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. गोळीबारासह पोलिसांवर अनेकदा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या मस्तावलेल्या वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
आरटीओकडे पत्रव्यवहार करणार
जप्त केलेले ट्रॅक्टर नेमके कुणाच्या मालकीचे आहे. त्यावर नंबर नाही, त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्याबाबत पत्र व्यवहार करणार आहे. यानंतर ट्रॅक्टर मालकाचा शोध घेण्यात येईल. कारवाईदरम्यान तीन कर्मचार्यांना दगडफेक झाली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले असून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. महसूल विभागाला कळविण्यात आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले.