यवत । दौंड आणि करमाळा महसूल यांच्या संयुक्त पथकाने भीमा नदी पात्रात चालू असलेल्या अवैध वाळू उपसा करणार्या 13 फायबर बोटी जिलेटिनच्या स्फोटाच्या सहाय्याने उडविण्यात आल्या. महसूल विभागाने एका महिन्यात सलग दुसर्यांदा केलेल्या कारवाईमुळे मात्र अवैध वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे मात्र बोटीधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सहभागी कर्मचारी
या कारवाईत देऊळगावराजे मंडल अधिकारी संजय स्वामी, विजय खारतोडे, मंगेश नेवसे, अरगडे तलाठी,सुनील जाधव, हरिश्चंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंगे, संतोष इडुळे, दिपक पांढरपट्टे, जयंत भोसले, शशिकांत सोनवणे, विश्वास राठोड, मोहसिन शेख, संजय माकर यांनी सहभाग घेतला.
बुधवारी अचानक छापा टाकून कारवाई
दौंड महसूल आणि करमाळा (जि. सोलापूर) यांच्या संयुक्त पथकाने भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असलेल्या खानोटा, औटेेवाडी, रामवाडी, बाभूळगाव, खेड, व राजेगाव परिसरात बुधवारी अचानक छापा टाकून अवैध वाळू उपसा करणार्या 9 फायबर बोटी आणि 4 सेक्शन बोटी अशा एकूण बोटी 13 बोटी जिलेटिनच्या स्फोटाच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि नायब तहसिलदार धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.