वाळू ट्रॅक्टरने जैनच्या कर्मचार्‍यास चिरडले

0

जळगाव । हाफ डे सुटी घेऊन घरी परतत असलेल्या जैन हिल्स येथील ऑपरेटर नरेंद्र दिनकर चौधरी (वय-55 रा. आराधना कॉलनी) यांना वाटेतच शिरसोलीकडून जळगावकडे भरधाव वेगात जात असलेल्या वाळु भरलेल्या ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना शिरसोली नाकाजवळ शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. यात चौधरी यांचा जागेवर मृत्यू झाला. घटनेनंतर मात्र, चालक हा ट्रॅक्टर परिसरातील जंगलात सोडून पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी ट्रॅक्टर व अपघातग्रस्त मोपडे दुचाकी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वळण घेतांना दिली धडक
शुक्रवारी सकाळी नाना भिल नामक तरूण हा शिरसोलीकडून जळगावकडे ट्रॅक्टर क्रं. एमएच.19.एल.8583 मधून वाळु वाहतुक करून घेऊन जात होता. त्या दरम्यान, जैन हिल्स येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले नरेंद्र चौधरी हे हाल्फ डे मेडीकल सुटी घेवून सकाळी 11 वाजेच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडले. 11.30 वाजेच्या सुमारास शिरसोली जकात नाकाजवळून चौधरी हे त्यांच्या मोपेड दुचाकी (क्रं. एमएच.19.डीए.3763) ने जात असतांना यांच्या पूढे चालक नाना भिल याचे ट्रॅक्टर चालत होते. शहरातून वाळु वाहतुकीस बंदी असल्याने जकात नाक्याजवळील कच्च्या रस्त्याातून वाट काढून शहरात प्रवेश करण्यासाठी चालक भिल याने मागे-पुढे न पाहता कच्च्या रस्त्याकडे वळण घेतले. यात मागुन येत असलेले नरेंद्र चौधरी यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक दिसून चौधरी हे खाली पडले. त्यात त्यांच्या पोटावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी
सुत्रांकडून मिळालेली माहिती नुसार घटनेनंतर चालक भिल हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला. अपघातस्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जैन हिल्स येथील कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने चौधरी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेल्यात आले. परंतू, तपासणीअंती चौधरी यांना डॉ. शेख यांनी मृत घोषित केले. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठल्यानंतर एकच आक्रोश केला.

अन् चालक फरार
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चौधरी यांचा चिरडल्यानंतर घाबरलेल्या चालकाने कच्च्या रस्त्याकडे भरधाव ट्रॅक्टर चालवत रस्त्यात ट्रॉलीत भरलेली वाळु फेकून दिली. यानंतर मेहरूण तलाव परिसरातील एका जंगल परिसरात ट्रॅक्टर सोडून पसार झाला आहे. यावेळी काही जणांनी ट्रॅक्टर चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, चालक हाती लागला नाही. यावेळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.

ट्रॅक्टर, दुचाकी जप्त
घटनास्थळावर आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली. यानंतर पोलिसांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालक व ट्रॅक्टर काही मिळून आले नाही. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातचे पोलिस कर्मचारी रामकृष्ण पाटील यांनी मेहरूण तलावाच्या जंगल परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेतला असता त्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळून आले. तर वाटेत रस्त्यात वाळु फेकलेली देखील दिसून आली. यानंतर पाटील यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत पोलिस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी अद्याप डॉ. शेख यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.