वाळू बनली मनुष्यवधाचा फास!

0

शिंदखेडा । अक्कडसे येथील यूवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरले म्हणून 3 वाळू ठेकेदारांसह महसूल विभागाच्या सात अधिकार्‍यांवर शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने आज शिंदखेडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गून्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या या आदेशानंतर महसूल विभागात खळबळ ऊडाली आहे. 3 ठेकेदारांसह दोन तहसीलदार, दोन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि प्रांत अधिकार्‍याचा आरोपांमध्ये समावेश आहे. किशोर भगवान कोळी (38) यांनी या सर्वांना आरोपी ठरवून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

दुर्घटनेनंतर खड्डा बुजण्याची हुशारी
9 एप्रिलरोजी अक्कडसे येथील सतीश छोटू सैंदाने (19) हा अक्कडसे येथून मनुमाता मंदिरावर जावळासाठी जात होता. तापी नदी पात्रातून जातांना पात्रातील पाण्यात तो पडला.हा खड्डा 50 फुटांहून जास्त खोल असल्याने सतीशचा बुडून मृत्यू झाला. नदीपात्रातील हा खड्डा बुजून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा खड्डा जळगाव येथील वाळू ठेकेदार दिपक सुधाकर पाटील , गोरख शालीग्राम पाटील, ज्ञानेशवर बन्सी पाटील यांनी बेकायदेशीर वाळू उत्खनन करून निर्माण केला होता. या ठेकेदारांना उप्परपिंड (ता. शिरपूर) येथील घाट क्रमांक 1 च्या क्षेत्रात ठेका मंजूर होता. तेथे उत्खनन न करता त्यांनी अक्कडसे (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात यंत्र सामुग्री वापरत शर्तीचा भंग करून 50 फुटांहून खोल वाळू उत्खनन केले.

बेकायदा उत्खननावर आक्षेप
या बेकायदेशीर कामाकडे अक्कडसचे तलाठी सुभाष साळुंखे, मंडल अधिकारी एस. आर. पाकरकर, शिंदखेडाचे तहसीलदार रोहिदास वारुडे, उप्परपिंडचे तलाठी जयवंत चव्हाण, मंडळ अधिकारी व्ही. के. बागुल, शिरपुरचे उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे आणि तहसीलदार महेश शेलार यांनी दुर्लक्ष केले . सतिशच्या मृत्यनंतर हा खड्डा बुजून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करून वाळू ठेकेदारांसह हे सात अधिकारीही सतीश सैंदानच्या मृत्युस जवाबदार धरून त्यांच्यावर गून्हा दाखल झाला आहे.