वाळू माफियांची दादागिरी : किनगाव सर्कलवर प्राणघातक हल्ला
पाच जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल : चारचाकीसह डंपर यावल पोलिसांनी केला जप्त ः चौघे आरोपी पसार
यावल : तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली असून प्रांताधिकार्यांच्या वाहनाला धडक देण्याची घटना जाती असतानाच किनगाव मंडळाधिकार्यांनादेखील वाळू माफियांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच संशयीतांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपाल प्रल्हाद सोळुंखे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
इशारा केल्यानंतरही थांबवले नाही डंपर
किनगाव मंडळाधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांनी या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून पाचा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री 9.40 वाजता तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये जगताप यांच्यासह तलाठी टेमरसिंग बारेला, विलास भिकाजी नागरे, राजू आप्पा, काशिनाथ आप्पा, निखिल मिसाळ, गणेश वर्हाडे, विजय साळवे यांच्यासह अवैधरीत्या गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी कर्तव्यावर असताना किनगाव बु.॥ गावी गेलो होता. रात्री 9.40 वाजता जळगावकडून डंपर (क्र.एम.एच.12 एफ.झेड.8425) येताना दिसल्याने चालकास ओळख दर्शवून सदर वाहन थांबविण्याचा इशारा केल्यानंतर डंपर चालकाने वाहन न थांबवल्याने किनगावकडे नेल्याने आम्ही या डंपरचा पाठलाग केला. किनगाव गावातील मशिदीजवळ गर्दी असल्याने डंपर तेथे थांबताच आम्ही डंपर चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश संजय कोळी (रा.कोळन्हावी) सांगितले. तर चालकासोबतच्या इसमाने विशाल कोळी (डांभूर्णी) असे नाव सांगितले. डंपरमधील वाळू बाबत परवा विचारल्यानंतर संबंधितानी काही उत्तर दिले नाही तर याचवेळी चारचाकी (एम.एच.19 एपी 4128) मधून गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, छगन कोळी आले.
सर्कलच्या हातीवर मारला बक्का
संशयीत गोपाळ यांनी तुम्हाला डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही, तुम्ही डंपर का पकडले? असे बोलून माझ्याशी हज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व माझ्या छातीवर जोरात बुक्का मारून व गाडीवर ढकलून दिले. त्यानंतर हा वाद गावातील भूषण नंदन पाटील, सचिन रामकृष्ण नायदे, जहांगीर तुराब तडवी, लुकमान कलंदर तडवी व सोबतचे स्टॉपने सोडवला. त्यानंतर टाटा कारने आलेले ईसम तेथून निघून गेले. त्यानंतर डंपरचा पंचनामा करून डंपर पुढील कारवाईसाठी यावल पोलिस स्टेशनला आणत असताना साकळी गावाजवळील भोनक नदीच्या दिशेने डंपर चालक गणेश कोळी याने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही याबाबत तहसीलदारांना डंपर चालक डंपर पळवून नेत असल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यासह समीर निजाम तडवी, ईश्वरलाल रमेश कोळी, शरद विठ्ठल सूर्यवंशी व हिरामण साळवे आदी शासकीय वाहनाने तेथे आले व त्यांच्या मदतीने आम्ही डंपर पुन्हा अडविला. त्यावेळी तेथे पुन्हा चारचाकी (एम.एच.19 एपी 4128) आली व कारमधील चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांनी नीपात्रात कार्यवाही सुरू असताना वाहन माझ्या अंगावर घालून माझ्यासह स्टॉपला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी तात्काळ बाजूला झाल्याने तेथून वाचलो व त्यानंतर कार तेथे थांबली व त्या कारमधील संदीप आधार सोळुंके (रा.कोळन्हावी,) जगन कोळी (रा.डांभुर्णी) आदी सर्वांनी आम्हाला शिवीगाळ केली तोपर्यंत तेथे बराच स्टॉप जमल्याचे व पोलिस येत असल्याचे समजल्याने त्या सर्वांनी सदर डंपर व कार तेथेच सोडून पळ काढला. त्यानंतर मी व स्टॉप कर्मचार्यांनी डंपर व कार पोलिसांच्या मदतीने यावल पोलीस स्टेशनला आणून जमा केली.
पाच संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा
यावल पोलीस स्टेशनला गणेश संजय कोळी, गोपाल प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे, विशाल कोळी, छगन कोळी या पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महसूल व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.