वाळू वाहतुकदारांचे बेमुदत वाहतूक बंद आंदोलन

0

जळगाव। नियमानुसार वाळू वाहतुक केली जात असतांना महसूल व परिवहन विभागाकडून होत असलेल्या अन्याय कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यांत बेमुदत वाळू वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव शहर बिल्डींग मटेरियल सप्लायर्स युनियनच्या माध्यमातून वाळू वाहतुकदारांनी बहिणाबाई उद्यानात घेतलेल्या बैठकीत घेतला. या बैठकीत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वाळू वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

250 वाळू वाहतुकदारांची उपस्थिती
जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांकडून वाळू वाहतूकीची पावती घेऊन जेथे जेथे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी मागणी प्रमाणे वाळू पुरविण्याचे काम बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सद्वारे वाळू वाहतुकदार करीत असतात. मात्र, परिवहन विभागाकडून वाळू वाहतुक करणारी वाहने अडवून वातुकदारांडे वाहतुकीचे परवाने असतांनाही वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याविरोधात वाहतुकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला असता प्रशासनाने वाळू वाहतुकदारांच्या मागण्यावर चर्चा देखील केली नाही. प्रशासनाच्या या आडमुठेपणाची भूमिकेचा निषेधार्थ जोपर्यंत वाळू वाहतुकदारांच्या मागण्या मान्य होत नाही होत नाही व अन्यायकारक कारवाई थांबवित नाही तोपर्यंत वाळू वाहतुक थांबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. याबैठकीला दगडू सपकाळे, हाजी फिरोजखॉ अरमानखॉ पठाण, संजय ढेकळे, सुपडू सोनवणे, भिकन नन्नवरे, नाना चौधरी, विठ्ठल पाटील, अमीत बच्छाव, संदेश टेकावडे, अजय बढे, रवि सपकाळे, विलास यशवंते, कुलभूषण पाटील, चेतन शर्मा, बाबू पटेल यांच्यासह सुमारे 250 वाळू वाहतूकदार उपस्थित होते.