इंदापूर । तालुक्यात अवैधरित्या दिवस-रात्र उघड्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. इंदापूर महसूल विभागकडून यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल वाहनचालकांमधून केला जात आहे.
नियमांची पायमल्ली करून बीकेबीएन या रस्त्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू वाहतूक सुरू आहे. या वाळू वाहनांवर कुठल्याही प्रकारची ताडपत्री वा कापड नसल्याने ही वाळू उडून इतर प्रवास करणार्या नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांना इजा होत असून अपघातही वाढले आहेत. इंदापूर महसूल विभागाने ही वाहतूक बंद केली तर नीरा नदीतील वाळुचा उपसा मोठ्या प्रमाणात थांबेल. यासाठी निमसाखर व निरवांगीच्या मुख्य चौकात कायमस्वरूपी महसूल विभागाकडून अधिकारी नेमण्याची गरज आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूक बंद होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. वाळू उपशाचा थेट परिणाम नदीच्या पात्रातील पाण्यावर होत आहे. यामुळे त्वरित वाळूचा उपसा बंद होणे गरजेचे आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते केवळ वाळू वाहतुकीमुळे खराब होत आहेत.