प्रत्येक ट्रकमधून वीस ते बावीस टन वाळुची वाहतूक
नवापूर:नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी 25 ट्रक जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. नवापूर हद्दीत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, पो.काँ.आदिनाथ गोसावी, जयेश बाविस्कर यांनी कारवाई केली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये वीस ते बावीस टन वाळू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुजरात राज्यातील तापी नदीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते.
बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू किंवा रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
गुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जाणार्या 25 ट्रकला नवापूर पोलिसांनी जुना सीमा तपासणी नाक्याजवळ पकडून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा केले आहेत. गुजरात राज्यातील निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, चाळीसगाव, याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई केलेली आहे. यासंदर्भात वाळूची वाहतूक करणारे ट्रक चालकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडे वाहतुकीसह वाळू संदर्भात सर्व कागदपत्रे असल्याचे सांगितले. परंतु नंदुरबार जिल्ह्यात बंदी असताना ट्रक मार्गस्थ होत असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून नंदुरबारमार्गे इतर भागात वाळू वाहतूक सुरू आहे. या भागात कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे. शासनाकडून जिल्हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. रेती किंवा वाळू वाहतुकदारांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कायदा, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता
वाळू अथवा रेतीच्या वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे. वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतूकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतुकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. याबाबी लक्षात घेता वाळू वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी केली आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दंडात्मक कार्यवाही करण्याकामी न्यायालयात समक्ष पाठविण्याची कारवाई सुरु आहे.