वाशी (जनशक्ति ब्युरो) । राज्य सरकार वाशी खाडीपुलावरील टोलनाक्याला आणखी १२ वर्षे मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे २०२६ मध्ये मुदत संपत असलेल्या या टोलची वसुली २०३८ पर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी हा आहे. नवी मुंबईकर, पनवेल-उरण, कोंकण-गोव्यासह पुणे, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांवरच हा भुर्दंड पडणार आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रस्ताव तयार केला आहे. तो लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरूनच हा प्रस्ताव तयार केला गेल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे या प्रस्तावाला शासकीय मान्यता मिळणे, ही केवळ औपचारिक बाब राहिली आहे. १९७७ मध्ये बांधल्या गेलेल्या पहिल्या खाडीपुलाची क्षमता १२,५०० कार प्रतिदिवस इतकी असताना सध्या तिथून १७,५०० कार प्रतिदिवस धावतात. त्यामुळेच एमएसआरडीसीला तिसऱ्या पुलाची गरज भासली.
मुंबईत प्रवेश टोलमुक्त
वाशी खाडीपूल टोलवसुलीची मूळ २०२६ ची मुदत संपल्यानंतर खरेतर मुंबईतील पाचही एंट्री पॉईंट्स टोलमुक्त होणार आहेत. मात्र आता वाशीतील मुदत वाढवून दिल्यास मुंबई एंट्री पॉईंटला (एमईपी) तिथे वसुली सुरु ठेवता येईल. मुंबईतील दहिसर, मुलुंड, लालबहादूरशास्त्री रॉड आणि ऐरोली खाडी पूल हे इतर चार प्रवेशद्वार मात्र आणखी ९ वर्षांनी टोलमुक्त होतील.
तिसऱ्या खाडीपुलास मंजुरी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिसऱ्या खाडीपुलास मंजुरी देण्यात आली आहे. पायाभूत विकास समितीने ही मंजुरी दिली. एमएसआरडीने त्यासाठी ७७७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता.
नव्या खाडीपुलाचा बांधकाम खर्च वसूल करण्यासाठी वाशी टोलनाका वसुलीला १२ वर्षे मुदतवाढ आवश्यक आहे. मात्र, इतर चार प्रवेशद्वारी टोलवसुली बंद करून वाशी टोलनाका न वापरणाऱयांवर अन्याय होऊ नये, याची प्रस्तावात काळजी घेतली आहे.
किरण कुरुंदकर,
सहकार्यकारी संचालक, एमएसआरडीसी
एमईपीने २०१० मध्ये एमएसआरडीसीकडून मुंबईतील पाचही प्रवेशाच्या ठिकाणी टोलवसुलीचे कंत्राट २१०० कोटीत मिळविले होते. एमएसआरडीसीने १०५८ कोटी रुपये खर्चून मुंबईत ३१ फ्लायओव्हर बांधले होते. हा खर्च वसूल करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील पाच प्रवेशद्वारांवर टोलवसुलीस मंजुरी दिली होती. मुंबई व नवी मुंबईला जोडणारा ठाणे खाडी वरील पहिला पूल १९७३ मध्ये बांधण्यात आला. १९८७ मध्ये दुसरा पूल (सहापदरी) बांधण्यास सुरुवात केली गेली जो १९९७ मध्ये पूर्ण झाला. आतापर्यंत सहापदरी नव्या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक व जुन्या पुलावरून हलकी वाहने जाऊ दिली जात होती. मात्र, सावित्री पूल दुर्घटनेनंतर, जुन्या पुलाला गेलेले तडे लक्षात घेऊन ऑगस्ट २०१६ पासून या पुलावरून वाहातून पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
न्यूमरिक्स
१९७७ पहिला खाडीपूल बांधला
१२,५०० कार प्रतिदिवस क्षमता
१७,५०० कार प्रतिदिवस धावतात