वाशीच्या ‘राकावियो’ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पुनर्वसन मे च्या आत करणार

0

मुंबई:- वाशी (नवी मुंबई) येथील राज्य कामगार विमा योजना (राकावियो) रुग्णालय वाशी येथील धोकादायक निवासी इमारतींचा मुद्दा आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित करण्यात आला. यावेळी धोकादायक इमारातीतील कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. तसेच या इमारती दुरुस्त करून सुस्थितीत आल्यानंतर वापरायोग्य केल्यावरच वितरित करण्यात येणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

वांद्रे पूर्वच्या आ. तृप्ती सावंत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आ. सावंत म्हणाल्या की, वाशीतील या रुग्णालयाच्या निवासी वसाहतीतील दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने 4 इमारती धोकादायक झाल्याने या इमारतीतील कर्मचाऱ्यांचे इतरत्र पुनर्वसन करावे अशी मागणी लोकसभा सदस्यांनी केली होती. या इमारतींची पाहणी केली आहे का? असा प्रश्न सावंत यांनी विचारला. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत व पुनर्वसनाबाबत काही कार्यवाही केली आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

याला उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, इमारतींची दुरवस्था झाली आहे. तेथील एकूण 16 पैकी 7 निवासी इमारती धोकादायक असल्याची माहिती दिली. या 7 पैकी 3 इमारतींमध्ये कर्मचारी राहत असून त्यांच्या पुनर्वसनाची तयारी झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच आयुक्तांमार्फत धोकादायक इमारतींची पाहणी केली असून वास्तव्यास योग्य आहे की नाही याचा आढावा घेतला गेला आहे. धोकादायक इमारतीतील 31 कर्मचाऱ्यांना वाशी, मुलुंड व ठाणे येथे पर्यायी निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले होते. यावर कर्मचाऱ्यांनी वाशी येथेच निवास मागितल्याने 31 पैकी 16 जणांची निवास व्यवस्था केली गेली असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील पर्यायी व्यवस्थेसाठी इमारतींची दुरुस्ती सुरु असल्याचे सांगत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण पुनर्वसन केले जाईल असे सांगितले. यावेळी ह्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी पाडून बांधण्याची आवश्यकता नाकारली. तसेच पालकमंत्री व खा. विचारे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.