नवी मुंबई । मनपाच्या वाशी येथील प्रथम संदभ रुग्णालयात नवी मुंबई मनपाच्या हद्दी बाहेरील रुग्णाच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांना इतर रुग्णालयात जावे लागत आहे. यावर मनपा आयुक्त व नगरसेवकांनी योग्य तो उपाय शोधावा अशी मागणी नवी मुंबईकर करत आहेत.
दरम्यान, बाहेरून येणार्या नागरिकांच्या हद्दीमधील रुग्णालयाकडे शासनाने त्यावर योग्य ते लक्ष केंद्रित केले तर अशी वेळ येणार नसल्याचे मनपा वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. मनपाचे वाशी येथील रुग्णालयाची क्षमता 300 खाटाची आहे. परंतु या ठिकाणी कल्याण ग्रामीण भाग, कर्जत, उरण, ठाणे, मुरबाड, शहापूर व मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, चेंबूर आदी विभागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्ण सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कोणत्याही रुग्णाला नाकारता येत नसल्याने वाशी रुग्णालयातील खाटा नेहमीच भरलेल्या असतात. त्यामुळे मनपा हद्दीमधील नागरिक दाखल होण्यास गेला तर त्या रुग्णाला ताटकळत रहाणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याने नागरिका मध्ये कमालीची नाराजी आहे.
खाटा रिकाम्या नसल्याने रुग्णांना जमिनीवर उपचार
खाटा रिकाम्या नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार करावे लागत असल्याचे वास्तव वाशी रुग्णालयात नियमित दिसत आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात कुचुंबना होत असल्याचे सुरेश खरात यांनी सांगितले. ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालये व तसेच उपजिल्हा रुग्णालयात अपेक्षित सेवा मिळत नसल्याने शेकडो रुग्ण वाशी रुग्णालयात चांगली सेवा मिळते म्हणून येत आहेत. यासाठी शासनाने आपल्या रुग्णालयावर योग्य प्रकारचा फोकस दिला तर ही वेळ येणार नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा बाहेरील येणार्या रुग्णा मूळे बाह्य तपासणी करणार्या डॉक्टरांवरही परिणाम होत असल्याचे वैदयकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे. दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासात तपास वैद्यकीय अधिकारी करत असल्याने त्यांच्यात कमालीचे निराश आल्याचे एका नाव न सांगण्याच्या अटीवर वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.