नवी मुबंई: वाशी मनपा रुग्णालयात काम करणार्या एका सफाई कर्मचार्याने सोमवारी सकाळी रुग्णालयातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे रुग्णालयात एकच खळबळ माजली असता त्या कर्मचार्याला उपचारासाठी तत्काळ त्याच रुग्णालयात भरती करण्यात आले.या प्रकरणाची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नरेश केशवराव भडके (30) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ऐरोली येथे राहणारे आहेत. ते वाशी मनपा रुग्णालयातील आय सी यू,ट्रॉमा वार्डमध्येे साफ सफाईचे काम करतात. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले असता त्यांनी मानसिक त्रासातून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, आणि त्याच वेळी त्यांनी फिनाईल प्राशन केले. या प्रकाराची माहिती मिळताच अन्य कामगारानी त्यांना तत्काळ त्याच रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या प्रकरणाची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.