वाशी स्थानकाची सुरक्षा रामभरोसे

0

गर्दुल्ले, भिकार्‍यांचा रेल्वे स्थानकाला विळखा; भविष्यात नशेसाठी हत्या होण्याची शक्यता

रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी

रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे प्रवासी वेठीस

प्रवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष कायम

नवी मुंबई । गर्दुल्यांनी व भिकार्‍यांनी वाशी रेल्वे स्थानकाला विळखा घातला आहे. त्यांनी वाशी रेल्वे स्थानकालाच आपले माहेरघर बनवले आहे. यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने यातील एका गर्दुल्याने तर अपहरण करण्यापर्यंत मजल मारली. यांच्यावर वेळीच अटकाव करण्यात आला नाही तर भविष्यात नशेसाठी यांच्याकडून एखाद्याची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी, गार्ड बोर्ड आणि रेल्वे पोलीस यांची सुरक्षा असतानाही हे करतात काय यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शहराच्या सायबर सिटीतल्या नागरिकांची सुरक्षा आजही वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे. वाशी रेल्वे स्थानक परिसरात वावरणार्‍या एका गर्दुल्ल्याने नशेत एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना बुधवारी घडली. सदर घटनेचे वृत्त मिडीयावर झळकल्याने गर्दुल्याने त्या मुलाला कळवा रेल्वे स्थानकावर टाकून पळ काढला. जागृत नागरिकांच्या मदतीमुळे अखेर तो मुलगा त्या पालकांना मिळाला. अन्यथा त्याचे काय झाले असते याचा थांगपत्ता ही लागला नसता. इतकी गंभीर घटना घडली असतानाही येथील सुरक्षा सतर्क होण्याऐवजी ढिसाळ असल्याची पाहायला मिळाली.

सोमवारी दुपारी पुन्हा एका गर्दुल्या दाम्पत्याचा हाणामारीचा प्रकार समोर आला. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सदरील गर्दुल्ले, भिखारी हे आपला मनमानी कारभार या परिसरात चालवत असल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानक व परिसरात जी.आर.पी., आर.पी.एफ.,गार्ड बोर्ड व खासगी सुरक्षेचे शेकडो कर्मचारी आहेत. मात्र हे फक्त सकाळ ते संध्याकाळ आपला दिवस भरून घरी कधी जाता येईल यात मग्न असल्याची चर्चा या परिसरात आहे. सुरक्षा रक्षक गार्ड बोर्डाचे या परिसरात दिवसभर फक्त ९ कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांची संख्या वाढायला हवी अशी मागणी होत आहे. भविष्यात जर एखादी गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

भिकार्‍यांनी बनवले अड्डे, सुरक्षा रक्षकांचा डोळेझाकपणा
भिकारी व गर्दुल्यानी स्थानकाच्या परिसरात आपले अड्डे बनवले असून ते दिवसभर तेथेच तळ ठोकून असतात. त्यांना कोणीही हटकत नसल्याने ते येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांचा छळ करत असतात. जर त्यांना वेळीच दिवसभर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रोखले तर थोड्या फार प्रमाणात त्यांच्यावर अंकुश येऊ शकतो, मात्र सुरक्षा रक्षक कंपन्या याकडे डोळेझाक करत असल्याने यावर अंकुश आणणार कोण असा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाला आहे.