वाशी हायवे बसथांबा अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर

0

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर असलेला वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा समोरील एसटी बसेसचा थांबा गेल्या अनेक वर्षापासून अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर बनला असून आजही या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यत या एसटी बसथांब्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रवासी वाहतुक होत आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी तसेच वाहतुक पोलीसही या एसटी बसथांब्यावर असतानादेखील ते या अनधिकृत प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा करताना पहावयास मिळत आहे.

अनधिकृत प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा
सायन-पनवेल महामार्गावरील वाशी प्लाझासमोरील हा एसटी बसथांबा अवैध प्रवासी वाहतुकीसाठी दोन दशकाहून अधिक काळ प्रसिध्द आहे. एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी तसेच वाहतुक पोलिसांनी या ठिकाणच्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा केल्याने या घटकांचे धाडस अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. अवैध प्रवासी वाहतुक करणार्यांची वाहने एसटी थांब्यावरच उभी राहू लागल्याने मानखुर्दच्या दिशेने आलेल्या एसटी बसेसना उभे राहण्यासाठी जागा शोधण्याची पाळी आली आहे.

अनधिकृत वाहतूक जोरात
वाशी हायवे एसटी बसथांब्यावर सकाळी व रात्री लक्झरी खासगी बसेेस मोठ्या प्रमाणावर उभ्या असतात. अलिकडच्या काळात सँट्रोे, मारूती व्हॅन व अन्य चारचाकी वाहने, इनोव्हा, झायलो आदी वाहनेदेखील बिनधास्तपणे उभे राहून वाहनचालक खारघर, कामोठे, पनवेल असे जोरदार ओरडत प्रवाशांना साद घालताना पहावयास मिळत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर,अहमदनगर, नाशिक तसेच कोकणात जाण्यासाठीदेखील लक्झरी बसेस व अन्य वाहने या एसटी थांब्यावर उभे राहून प्रवाशांना घेवून जात आहे.

वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष
एसटी बसथांब्याच्या विरूध्द बाजूलाच उड्डाणपुलाखाली वाहतुक पोलिसांची वाशी चौकी असतानाही मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे वाहतुक पोलीसदेखील या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारीदेखील या ठिकाणी उपलब्ध असताना ते या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत बघ्याची भूमिका घेत आहेत. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे दररोज एसटी महामंडळाचे हजारो रूपयांचे नुकसान होत आहे.