वासिंदमध्ये गंजलेले लोखंडी पोल जीवावर बेतण्याची शक्यता

0

वासिंद : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी या महावितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे गंजलेले जुने लोखंडी वीजवाहिन्यांचे पोल वेळीच न बदल्याने वासिंदजवळील पाली या गावातील जीर्ण झालेले लोखंडी पोल मोडकळीस आले आहेत. हे पोल कित्येक वर्ष बदलण्यात न आल्याने त्यांना प्रचंड गंज चढलेला आहे. बर्‍याच ठिकाणी लोखंडी पोल वीज वाहिन्यांसह वाकलेले दिसत आहेत.

महावितरण कंपनीचे दुर्लक्ष
वासिंदमधील हे गंजलेले पोल आता अखेरच्या घटका मोजत असून केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भिती आहे. त्यामुळे हे लोखंडी पोल बदलण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. मागणी करुनही त्याकडे महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना ग्रामीण विभागप्रमुख बाळाराम तरणे यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा
पालीगावसह साने, सारमाळ दहागाव, भातसई या ग्रामीण भागातील गावांतही लोखंडी पोल मोडकळीस आले आहेत. हे पोल कधीही कोसळून जीवित्तहानीचा धोका आहे. याला सर्वस्वी वीज वितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहतील याकरीता त्वरीत हे मोडकळीस आलेले पाली गावातील पोल बदलावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वासिंदचे शिवसेना ग्रामीण विभागप्रमुख बाळाराम तरणे यांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीच्या शहापूरच्या सहाय्यक अभियंत्यांना दिला आहे.