वासिंद : मध्य रेल्वेच्या वासिंद स्थानकजवळील वासिंद – मुरबाड रस्त्यावरील वासिंद पुर्व – पश्चिम जोडणारा रेल्वे गेट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तर रेल्वे अंडरपास बोगद्यात पावसाळ्यात पाणी साचून हा मार्ग बंद पडतो. यामुळे वासिंद व परिसरातील 42 गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो आणि गावांतील हजारो ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. या बंद रेल्वे गेटच्या जागी आता रेल्वे उड्डाणपुलाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. तथापि, नियोजित रेल्वे उडडाणपूल बांधकाम पूर्ण होईपर्यत नागरिकांचे होणारे हाल विचारात घेऊन नियोजित रेल्वे उडडाणपूल बांधकाम पूर्ण होईपर्यत तसेच बोगद्याला पर्यायी मार्ग असलेला बंद रेल्वे गेट खुले करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वासिंद येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने वासिंद बंद रेल्वे गेट व रेल्वे बोगदा पुलाच्या घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
पुलाची केली पाहणी
नुकतेच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेलूर यांनी याचिकेची गंभीर सुनावणी घेत प्रत्यक्ष पाहणीसाठी उच्च न्यायालयीन आयोग न्यायमूर्ती अभय ओक यांना नेमले असून या आयोगामध्ये जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सचिव व अन्य कायदेतज्ञांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे आयोग प्रत्यक्ष पाहणीसाठी वासिंद बंद रेल्वे गेट व रेल्वे बोगदा पूलाच्या घटनास्थळी आले. यावेळी आयोगातील जिल्हा न्यायाधीश संजय यादव यांनी वासिंद बंद रेल्वे गेट व रेल्वे बोगदा पुलाच्या घटनास्थळी पाहणी केली. हा पाहणी अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
याची होती उपस्थिती
यावेळी मध्य रेल्वे असि. डिव्हीजनल मॅनेजर सदिशन, शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, याचिकाकर्त्यांच्या वकील शकुंतला वाडेकर, याचिकाकर्ते संजय सुरळके, संघर्ष समितीचे रविकांत घाटे, स्थानिक राजकीय नेते अनंत शेलार, संदीप पाटील, बाळकृष्ण गायकवाड, सरपंच राजेंद्र म्हस्कर, दत्तात्रय ठाकरे, मधुकर गायकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष निलेश काठोळे, रमाकांत काठोळे, सचिन जाधव सुजान वडके, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश पाटील, राहूल दोंदे, चंद्रकांत जाधव, सचिन घेगडे, शास्त्री कॉलनी अध्यक्ष सुधन्वा बोडस आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.