मुरुड (नितीन शेडगे) : वासुदेव म्हणजे लोकसंस्कृतीतला एक महत्त्वाचा घटक. कधी काळी गाव जागवत येणारा हा वासुदेव आता उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय. पण त्याला आता कुठेच हक्काचे दान मिळत नाही. त्यामुळे अभावानेच ग्रामीण भागात दिसणाऱ्या वासुदेवाचे दर्शन मुरुडवासियांना सुखावणारे ठरले आहे. घाटमाथ्यावरून हे वासुदेव मुरुड परिसरात आले आहेत.
कोकणात एकदा भाताची सराई पिकली की दिवाळीचे दीप मावळल्यावर घाटावरून नाना मांगतेकरी कोकणच्या आगरात उतरतात. त्यात दरसालचा नंदीबैल प्रमुख. त्याच्या जोडीला सुया घ्या, पोत घ्या करीत विकणाऱ्या गोसाविणी, कोकेवाला, जादूवाला, डोंबारी, गुण्याबैल, जरीमरीचा भगत, ज्योतिषी असे कितीतरी जण आपल्या आयुधांसह लोकांचे मनोरंजन करीत भिक्षा मागत गावोगाव फिरत असतात. त्यात वासुदेव विरळा. छल्लक् छल्लक् टाळ वाजवीत गाव जागवीत येणारा वासुदेव कोकणच्या वाट्याला वाटेला सध्या फारसा येत नाहीच. त्यामुळे यंदा वासुदेव मुरुडचे आकर्षण ठरत आहे.
प्रत्यक्ष श्रीकृष्णाचेच रूप…
पूर्वी पहाटेला जात्याच्या घरघरीतून ओव्या प्रकटायच्या. त्याचवेळी- “वासुदेव आला हो, वासुदेव आला” असे गाणे गात एका हातातली चिपळी व दुसऱ्या हातातले टाळ, मध्ये पावा वाजवीत अंगणात वासुदेव आलेला असायचा. गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर मोरपिसांची निमुळती उंच टोपी, अंगात घोळदार झगा, पायांत घुंगरू, खांद्यावर शेला, काखेत झोळी असा सुरूप दिसणारा वासुदेव आपल्या अंगणात आला की, प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटीस आलाय असे वाटायचे. मग घरातील आयाबाया, पोरेबाळे त्याचे दर्शन घेत. त्याच्या झोळीत सुपातून धान्य टाकीत, हातावर आणा ठेवीत. त्यावेळी वासुदेव आनंदून म्हणे – “दान पावलं दान पावलं, शंकराच्या नावानी इठ्ठलाच्या नावानी… भाग्यीवंत माउली दान पावलं..” हे असे गाता गाता तो श्रीकृष्णाची, जानाईची, चांगुणेची गाणीही गायचा.
दानासाठी सूप आहे कुठे?
वासुदेव पूर्वी सकाळी गाव जागवीत यायचा. लोकांना ते श्रीकृष्णाचे रूप वाटायचे. आधुनिकीकरणाच्या रेट्यात आता कामावर जायला लोक वासुदेवाच्या आगमनाआधी जागेच असतात. त्यांना उठवायची गरज काय? आणि त्यांना हरिनामात मौज काय? ग्रामसंस्कृतीशी घेणे-देणे काय?… सुपातून दान द्यायला आज कुणाकडे सूप नाही आणि घरच्या शेतातील धान्यही नाही. वासुदेव दिले दान कपाळी लावून नमस्कार करून निघून जातो…
धुकोट म्हणूनही ओळख…
वासुदेव ही महाराष्ट्रातील एक भिक्षेकरी जात. त्यांना धुकोट नावानेही ओळखतात. हे लोक दक्षिण महाराष्ट्रात जास्त दिसतात. कुणबी स्त्रीला ब्राह्माण ज्योतिष्यापासून सहदेव नावाचे मूल झाले, त्यापासून वासुदेवाची उत्पत्ती झाली असे ते मानतात. वासुदेव – भिक्षेकरी होण्याचा एक विधी असतो. शुभ दिवशी पुरोहिताला घरी बोलावून आणतात. तो ज्या मुलाला वासुदेवाची दीक्षा द्यायची आहे त्याला वासुदेवाचा पोशाख घालायला सांगतो आणि समंत्र त्या मुलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो, की मग तो मुलगा वासुदेव होतो. चारी दिशा गाणी गात भिक्षा मागण्यास मुक्त होतो.