वासुली : येथील उपसरपंच सुरेश श्रीपती पिंगळे यांच्या वासुली फाट्यावरील ‘सायली ग्रुप’ नावाच्या संपर्क कार्यालयावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. विना क्रमांकाच्या दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी कोयते, तलवारी, हॉकी स्टिकच्या साहाय्याने पिंगळे यांच्या संपर्क कार्यालयासह शेजारील दुकाने, पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी, कार यांचीही तोडफोड केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला कोणी व का केला? याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्य किंवा व्यवसायातील चढाओढीतून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुण्याई कॉम्प्लेक्समध्ये आहे कार्यालय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पिंगळे हे वासुलीचे उपसरपंच आहेत. ते वासुलीतील भामचंद्रनगरात राहतात. ग्रामपंचायतीचा कारभार पाहता यावा तसेच ते लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्याने एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये व्यवसाय करता यावा, या उद्देशाने वासुली फाटा याठिकाणी असलेल्या पुण्याई कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी सायली ग्रुप नावाने संपर्क कार्यालय सुरू केले आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास विना क्रमांकाच्या दुचाकींवरून आलेल्या अज्ञात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी सुरुवातीला कार्यालयाचा काचेचा दरवाजा फोडला. यावेळी कार्यालयात पिंगळे यांचे भाऊ लहू पिंगळे, मंगेश पवार, सुनील हे उपस्थित होते. अचानक झालेल्या या प्रकाराने ते घाबरून गेले.
हल्लेखोरांनी माजविली दहशत
संपर्क कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी खाली उतरून पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींसह (एमएच 14 इएफ 9585) क्रमांकाच्या स्विफ्ट कारची तोडफोड करत नुकसान केले. हल्लखोरांकडून हा प्रकार सुरू असताना तेथील काही नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोरांनी कोयते, तलवारींचा धाक दाखवून दमदाटी करत कोणासही मध्ये पडण्यास मज्जाव केला. हल्लेखोरा तोडफोड करत असताना दमदाटी व शिवीगाळ करत होते. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
यापूर्वी वासुली फाटा परिसरात अशी घटना घडलेली नाही. ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यामुळे त्यांनी ओळख पटू शकली नाही. हल्ला झाला त्यावेळी उपसरपंच सुरेश पिंगळे हे कार्यालयात हजर नव्हते. त्यांची मुलगी सायली हिचा वाढदिवस असल्याने ते कुटुंबीयांसोबत चिंचवड येथे खरेदीसाठी गेले होते. कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती पिंगळे यांना त्यांचे भाऊ लहू पिंगळे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर पिंगळे यांनी चाकण पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी येऊन प्राथमिक माहिती जाणून घेतली.
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
हल्लेखोर संपर्क कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या एका संशयिताची ओळख पटली असून, तो देहूगाव येथील आहे. सध्या तो कान्हेवाडीत राहत असल्याची माहिती सुरेश पिंगळे यांनी दिली. कार्यालयाची तोडफोड झाली; तेव्हा एक निनावी फोन मला आला होता. फोनवरून बोलणार्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
हल्ल्याला राजकीय किनार?
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, 22 ऑगस्ट 2015 रोजी सुरेश पिंगळे हे वासुली ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले होते. ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे एक तर राजकीय पूर्ववैमनस्यातून किंवा व्यवसायातील चढाओढीतून त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, लवकरच हल्लेखोरांना पकडण्यात येईल, असे चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी सांगितले.