बसच्या दारात उभे राहू नका म्हटल्यावरून आला राग
निगडी : चालत्या पीएमपीएमएल बसच्या दारात उभे राहणे धोक्याचे आहे, असे सांगणा-या बस वाहकाला एका प्रवाशाने अन्य साथीदारांना बोलावून बेदम मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास कासारवाडी बस थांबा ते भक्ती शक्ती चौक दरम्यान घडला. प्रशांत ढोले (वय 32, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवे मारण्याचीही धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पीएमपीएमएल विभागात बस वाहक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कासारवाडी ते निगडी बसमध्ये कार्यरत होते. कासारवाडी बस स्थानकावरून बस सुटल्यानंतर एक प्रवासी बसच्या दारात लटकत उभा होता. प्रवाशाच्या सुरक्षेसाठी प्रशांत यांनी त्या इसमाला बसमध्ये बसण्याचा सल्ला दिला. यामुळे दारात उभा राहिलेल्या इसमाला राग आला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले. दरम्यान, दारात उभा राहिलेल्या इसमाने आपल्या अन्य तीन साथीदारांना निगडी मधील भक्ती-शक्ती चौकात बोलावून घेतले. बस भक्ती-शक्ती चौकात गेली असता, चौघांनी मिळून प्रशांत यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यावेळी त्या बसवर चालक म्हणून कार्यरत असलेले उद्धव कसबे यांना पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चालक व वाहक करत असलेल्या सरकारी कामात वरील चार इसमांनी अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून महिला पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे तपास करीत आहेत.