शहादा । शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीचे योग्य नियमन होण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक एकेरी मार्गाने करण्याची गरज असल्याचे मत शहरवासीयांकडून व्यक्त केले जात आहे. गेल्या 30 वर्षांपासून शहरातील वाहतुकीची समस्या कायम असून, प्रशासनाकडून ही समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
दहा दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस कार्यालयाचा आवारात शांतता कमिटीची बैठक झाली होती. त्यात रहदारीच्या समस्येवरुन माजी नगराध्यक्ष अशोक बागुल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक सुपडु खेडकर, माकपाचे सुनील गायकवाड, जि.प. सदस्य अभिजित पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील रहदारीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. आता पोलीस निरीक्षक संजय शुक्ल तसेच नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ काय भूमिका घेतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत झाले तात्पुरते प्रयत्न
शहरातील रहदारीची समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. काही पोलीस अधिकार्यांनी वाहतुकीला चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. पण तो तात्पुरता होता. कायमस्वरूपी उपाय न झाल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न गहन होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासन यांची भूमिका महत्त्वाची आहे. वाहनधारकांना कोणत्याही कायद्याच्या धाक राहिलेला नाही. कोणता वाहनधारक कोणत्या मार्गाने आत घुसेल, हे सांगता येत नाही. एखाद्या वेळी मध्येच अवजड वाहन घुसले की तासन्तास वाहतूक ठप्प होते. आधीच शहरातून जाणारा मुख्य एकमेव मार्ग दुतर्फा झाल्याने अरुंद झाला. त्यात रोज हातगाडीवाले रस्ता काबिज करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येतो.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
वास्तविक पाहता वाहतुकीची समस्या उद्भवू नये, याची जबाबदारी वाहतूक पोलीस कर्मचार्यांची आहे. परंतु, ते आपली जबाबदारी नेमकी पार पाडत नाहीत. अनेकदा वाहतुकीच्या विषयावरून नागरिकांमध्ये वाद होतात. काही वेळा तर कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. परंतु, तरीही वाहतूक पोलीस आपले कर्तव्य निभावताना दिसत नाहीत. अनेक वर्षांपासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ, नगरपालिकेजवळ एकमार्गी वाहतूक व प्रवेश बंदचे फलक लावले आहेत. पण त्यानुसार कार्यवाही होत नसल्याने ते कुचकामी ठरत आहेत. डायमंड कॉर्नरजवळ तर रस्त्यावरच हातगाड्या,भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. त्यात दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू राहते. डायमंड कॉर्नरजवळ पायी चालणेही कठीण होते. अशी परिस्थिती असल्याने एकमार्गी वाहतूक सक्तीने पोलीस प्रशासनाला करावीच लागणार आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ देखील एकमार्गी वाहतूक आवश्यक आहे. शहरातून सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतांना नियमांचे पालन न करणार्या वाहनधारंकावर कारवाई केली जात नाही.