वाहतुकीचे विमान उंच उडाले, पण विमानतळ मात्र बुडाले

0

मुंबई : हवाई वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी व संपर्क व्यवस्था विस्तारण्यासाठी विमानतळ विकासाचा केलेला प्रयोग सरकारला लाभदायक ठरलेला नाही. कारण त्यातून विकसित केलेल्या १२५ पैकी १०९ विमानतळ तोट्यात चालवावे लागत आहेत. त्यातही ३० विमानतळ असे आहेत, जिथे महिन्यातून एकाही विमानाचे उड्डाण होत नाही की कुठले विमान उतरत नाही. त्यामुळेच तिथली व्यवस्था सुसज्ज राखण्याचा भुर्दंड मात्र सरकारला उचलावा लागत आहे. गेल्या दहा वर्षात हवाई वाहतुकीचे विमान खुप उंच उडाले हे सत्य असले, तरी बहुतांश विमानतळांत गुंतलेले पैसे मात्र बुडाले असे म्हणायची पाळी आली आहे.

हवाई वाहतुकीची चोख व्यवस्था राखण्यासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ़ इंडिया नावाची स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली व महत्वाचे जिल्हे व शहरांना हवाई वाहतुकीने जोडण्याची महत्वकांक्षी योजना राबवण्यात आली होती. अनेक खाजगी कंपन्यांनाही या क्षेत्रात परवाने देण्यात आले. पण मध्यम वा छोट्या शहरांना जोडणार्‍या विमानतळांना तितका प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळेच १०९ विमानतळांच्या देखभालीचाही खर्च वापरातून वसुल होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

देशभरातील केवळ १३ विमानतळ फ़ायद्याचे ठरले असून त्यातील बहुतेक मोठे विमानतळ खाजगीकरणाने अत्याधुनिक करण्यात आलेले आहेत. त्यात खाजगी गुंतवणूक करण्यात आली आहे. पण जिथे तुरळक वाहतुक आहे, त्या विमानतळांची व्यवस्था उपरोक्त संस्थेलाच करावी लागते. त्या भागातील विमानाच्या प्रवासाला प्रतिसाद मिळत नसल्याने भुर्दंड वाढला आहे. त्यावर मात करण्यासाठी आता तिथला विमान प्रवास स्वस्त करून, प्रवाशांना आकर्षित करण्याचाही विचार सरकारने चालविला आहे.