वाहतुकीबद्दल महापौरांचे उपायुक्तांना पत्र

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील बहुतांश रस्ते विकसित केलेले आहेत. परंतु, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व्यवस्थित नसल्याने शहरात वांरवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापौर नितीन काळजे यांनी केली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांना पत्र पाठविले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहर प्रशस्त रस्ते असून बहुतांश रस्ते विकसित केलेले आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे शहराच्या विविध भागांत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झालेले असून त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

शहरातील रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतपणे वाहने पार्कींग केली जातात. तसेच वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ चालू असल्यामुळे या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महापौर काळजे यांनी निवेदनातून केली आहे.