तळेगाव दाभाडे : शहरातील वाहतूक नियोजनास अडथळा ठरणारी बेकायदेशीर अतिक्रमणे काढून टाकावीत या मागणीचे निवेदन तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुटराव पाटील यानी मुख्याधिकारी वैभव आवारे यांना दिले. शहराचा वाहतूक नियोजन आराखडा पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षकांनी निश्चित केला असून कार्यवाहीसाठी तो तळेगाव पोलिसांकडे सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
हॉटेल, घरे व लोटगाडीवाल्यांचे अतिक्रमण
शहरातील स्टेशन चौक परिसरात काही दुकानदारांनी आणि घरमालकांनी पत्र्याचे व कागदाचे बेकायदेशीर शेड उभारली असून ती हटविणे गरजेचे आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन समोरील यशवंतनगर या ठिकाणी काही दुकाने अतिक्रमण करून उभारली आहेत. तर काही दुकानदार व हॉटेल चालकांनी पत्र्याची छपरे उभारली आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. जिजामाता चौक व मारुती मंदिर चौक या ठिकाणी हातगाडीवाल्यांची अतिक्रमणे आहेत. या शिवाय चाकण रस्त्यावरील स्टेशन चौक ते आयडीबीआय बँकेपर्यंतच्या रस्त्यावर हातगाड्यांवरुन विविध व्यवसाय करणार्यांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सदरची बेकायदा अतिक्रमणे त्वरीत काढून टाकावीत तसेच याकरिता योग्य बंदोबस्त दिला जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, शिक्षण समिती सभापती संग्राम काकडे, आरोग्य समिती सभापती अमोल शेटे उपस्थित होते.