वाहतूककोंडीने वाढतोय मुत्राशयाचा विकार

0

नवी मुंबई । अक्षयकुमारच्या टॉयलेट चित्रपटाने भारतात चांगला गल्ला जमविला असून शहरी व ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्याविषयी चांगलीच जनजागृती झाली आहे. परंतु, शहरातील नागरिक वाढत्या ट्रॅफीक समस्यांमुळे शौचालयाचा वापर करीत नसल्यामुळे मूत्राशयाच्या आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत, तसेच मुंबईत मेट्रो व काही उड्डाण पुलाची कामे सुरू असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाण्याच्या रस्त्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा हा एक चिंतेचा विषय बनला आहे.

वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दिवसातील 5 ते 6 तास या ट्रॅफीकचा सामना करावा लागतो व यामुळे नागरिकांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी मूत्राशयाच्या आजारात वाढ झाली आहे असे वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलच्या युरॉलॉजी क्लीनिकने केलेल्या एका वैद्यकीय पाहणीतून निदर्शनास आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. सोमण डे सांगतात, जेव्हा प्रवासामध्ये तुम्ही ट्रॅफीक मध्ये अडकल्यावर मूत्रविसर्जन करण्यास विलंब लागतो त्यामुळे किडनीवर ताण येऊन मूत्राशयाच्या आजारांमध्ये वाढ होते. महिलांमध्ये पुरुषांच्या मूत्रनलिका आखूड व कमी असल्यामुळे महिलांना जंतुसंसर्गाची लागण होते.

महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे हवी
शहरात महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध झाल्यास यास काही प्रमाणात आळा बसेल. येणार्‍या काळात वाहनांची संख्या ही वाढणारच आहे व त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वाना करावा लागणार असून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावी अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलच्या युरॉलॉजी क्लीनिकतर्फे देण्यात आली.