हडपसर : कॅगच्या अहवालामुळे रेल्वे लाईन गेटजवळील भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे दोन पर्यायी भुयारी मार्गांची निर्मिती करून वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचा प्रयत्न महापालिकेच्या निधीतून रेल्वेच्या सहकार्याने भाजप करत आहे. नागरिकांना भेडसावत असलेला वाहतूककोंडीचा प्रश्न कसलेही राजकारण न करता सुटला पाहिजे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्यासाठी बांधील आहोत, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले.पर्यायी भुयारी मार्गाच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून फोश संघटनेने रवी पार्क येथे सर्व सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी टिळेकर बोलत होते. उज्वला जंगले, सुभाष जंगले याप्रंगी उपस्थित होते.
भुयारी मार्गाच्या जागेची पाहणी
गेट नं 7 वर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी 185 कुटुंबाना स्थलांतरित करावे लागेल, काही घरांचे रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने संपादीत करावयाची जमीन ही मनपाच्या ताब्यात मिळू शकत नव्हती, त्यामुळे दुसर्या पर्यायी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय रेल्वे अधिकार्यांसोबत पाहणी करून घेतलेला आहे. याकरीता सर्व प्रशासकीय परवानग्या आणि नियमांची पूर्तता ही करण्यात आलेली आहे. आवश्यक तो निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, आणि सहा महिन्याच्या कालावधीत रवी पार्क सोसायटी जवळ आणि ससाणे नगरमधील न्यू इंग्लिश स्कूल समोर हे दोन्ही भुयारी मार्ग पूर्ण होतील, असे यावेळी सांगण्यात आले. आमदार टिळेकर यांनी यावेळी रेल्वे व पुणे महापालिकेच्या अधिकार्यांसह प्रस्तावित भुयारी मार्गाच्या जागेची पाहणी केली.