पुणे : केंद्रीय परिवहन खात्याने केलेल्या शुल्कवाढ, थर्ड पार्टी इन्श्युरन्समधील 60 टक्के वाढ आदी प्रश्नांच्या अनुषंगाने ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे शनिवारी मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि वित्त मंत्रालयातील अधिकारी आणि वाहतूक संघटनांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
दोन समित्या नेमणार
नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि वित्त मंत्रालयातील अधिकारी आणि वाहतूक संघटनांमध्ये बैठक पार पडली. या वेळी थर्ड पार्टी इन्श्युरन्समध्ये प्रस्तावित 50 टक्के दरवाढ 23 टक्क्यांनी कमी करीत 27 टक्के करण्याचे आश्वासन देण्यात आले; तसेच परिवहन शुल्कवाढ तसेच टोलसंबंधातील प्रश्नांसाठी वाहतूक संघटना तसेच शासनाच्या वतीने एक समिती तयार करण्यात येईल. या दोन्ही समित्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.