महाड येथील आरटीओ कॅम्प उधळला
महाड – महाड येथे वाहनांचे पासिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत येथे आरटीओ कॅम्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेत महाडमधील वाहतूकदारांच्या संघटनांनी मंगळवारी महाड येथील आरटीओ कॅम्प पुन्हा एकदा बंद पाडला.
आमदार भरत गोगावले यांनी आरटीओ कॅम्पला भेट देत वाहतूकदार संघटना आणि आरटीओ अधिकार्यांशी चर्चा केली व या ठिकाणी पासिंगची सुविधा त्वरीत उपलब्ध करून देण्याचे आवाहन आरटीओ अधिकार्यांना केले. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच महाड येथे कॅम्प घ्या अशा सूचना दिल्या.
पासिंगसाठी तीनचाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांचे पासिंग करण्यासाठी ही वाहने पेण आरटीओ कार्यालयात न्यावी लागणार आहेत त्याला रायगड जिल्ह्यातून विरोध होत आहे. महाड तालुका रिक्षा संघटनेने आठ ऑगस्ट महाड येथील आरटीओ कँपवर मोर्चा नेला होता. मात्र त्यानंतर गेल्या आठ दहा दिवसांच्या कालावधीत आरटीओ विभागाने कोणताच निर्णय न घेता आज पुन्हा महाड येथे कॅम्पचे आयोजन केले होते. त्यामुळे वाहतूकदारांच्या संघटनांनी आक्रमक होत आज पुन्हा एकदा या कॅम्पवर धडक दिली आणि हा कॅम्प बंद पाडला. आमदार भरत गोगावले यांनी वाहतूकदारांच्या भूमिकेचे समर्थन करत आरटीओ अधिकार्यांशी चर्चा केली.