वाहतूक कोंडीमुळे वीस मिनिटांच्या प्रवासाला लागतो तास

0

चिंबळी : पुणे नाशिक महामार्गावरील मोशी मुख्य चौकासह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आता नित्याचीच बाब झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे रोज होत असलेली वाहतूक कोंडी स्थानिकांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. केवळ वीस मिनिटांच्या प्रवासासाठी तास न तास कोंडीत रखडावे लागत आहे.

मोशी येथे जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, कामगार तसेच प्रवाशी, भाविक, पुणे चाकण आळंदी, देहू आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातात. मोशीतून चाकण किंवा पुण्याकडे जाण्यासाठी अवघी वीस मिनिटे पुरेशी होतात परंतु वाहतूक कोंडीमुळे तास न तास वाया जात आहेत.

सकाळी व सायंकाळी कामगारांच्या बस व प्रवासी वाहनांमुळे टोल नाका ते देहू आळंदी रस्ता ते भारतमाता चौक जुना जकातनाका, लाडंगे नगर, खडीमशीन, स्पाइनरस्ता ते राजा शिवछत्रपती चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सहा आसानी रिक्षाचालक बेशिस्तपणे ओव्हरटेक करतात चौकामध्येच अचानक थांबतात आणि वाहतूक कोंडीला आणखी बिकट बनवितात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. कित्येक अपघात या मार्गावर घडले असून केवळ बेशिस्तपणामुळे बर्‍याच जणांना प्राणास मुकावे लागले आहेत, तर कित्येक कायमचे अधू झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने या मार्गाकडे विशेष लक्ष देऊन बेशिस्तांवर कारवाई करावी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक ती कायमस्वरुपी कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.