वाहतूक कोंडीवर ‘महामेट्रो’तर्फे उपाययोजना

0

समस्या उद्भवल्यास नागरिकांच्या सुविधेसाठी 18002705501 क्रमांक

पिंपरी-चिंचवड : महामेट्रोच्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी येथील हॅरीस पूल दरम्यान सध्या व्हाया डक्टचे काम सुरू असून यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रोच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या मार्गिकेवर सहयोग केंद्र व ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिशादर्शक इलेक्ट्रॉनिक फलक
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नाशिक फाटा ते खराळवाडी दरम्यान मुंबईकडे जाणा-या ग्रेडसेप्रेटराच्या दोन्ही लेन सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत व रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत बंद राहतील. इतर वेळी एक लेन ही वाहतुकीसाठी खुली राहील. तसेच पुण्याकडे येणारी ग्रेडसेप्रेटरची एक लेन ही कायम खुली राहणार आहे. याशिवाय सीएमई ते नाशिक फाटा ग्रेडसेप्रेटरची पुण्याकडे व मुंबईकडे जाणारी एक- एक लेन ही वाहतुकीसाठी कायम खुली राहणार असून जड वाहनांनी सर्व्हिस रस्त्याचा जास्तीच जास्त वापर करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक स्ट्रेचच्या सुरुवातीला मोठे एलईडी फलक व इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात आले असून खडकी सिग्नल ते नाशिक फाटा व निगडी ते हॅरीस पूल पर्यंत मराठी व इंग्लिशमध्ये दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.

24 तास 30 मार्शल तैनात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन, खराळवाडी येथे दोन, नाशिक फाटा येथे तीन, दापोडी पूल (सीएनजी पेट्रोलपंप) येथे तीन, मेगामार्ट येथे दोन, सीएमई सिग्नल येथे तीन असे एकूण दिवसभर 15 व रात्री 15 असे एकून 30 मार्शल या ठिकाणी तैनात असतील. याव्यतिरिक्त वरील सर्व ठिकाणी पुणे शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून पुणे मेट्रोच्या वतीने एक निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पेट्रोलिंग व्हेईकल उपलब्ध
एक ’क्विक रिस्पॉन्स टीम’ (क्यूआरटी) देखील याठिकाणी तैनात असेल. ज्यामध्ये गस्त घालण्यासाठी एक ’पेट्रोलिंग व्हेइकल’ असून त्यावर माजी पोलीस अधिकारी मेट्रोकडून तैनात करण्यात आले आहेत. याद्वारे ज्या हद्दीत पुणे मेट्रोचे काम सुरू असेल तेथे वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही आणि वाहतूक सुरळीत सुरू राहील यासाठी ही टीम प्रयत्नशील असेल. जर या ठिकाणी काही अडथळा आला तर याबद्दल सदर टीम कॉल सेंटरमधील अधिका-यांना कळवून त्या अडथळ्या संबंधी आगाऊ माहिती तत्परतेने संबंधित अधिका-यांना देईल. अशा पद्धतीची यंत्रणा ही ’रिच 1’ अर्थात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवर उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच ती वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सहयोग केंद्र सुरू
पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेवर वल्लभनगर, एसटी स्टॅण्डमागे सहयोग केंद्र आजपासून सुरू करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांना अधिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त 18002705501 हा टोल फ्री क्रमांक देखील खास पुणे मेट्रोसाठी सुरू करण्यात आला आहे. काही समस्या आल्यास अथवा माहिती हवी असल्यास नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रामनाथ सुब्रमण्यम् यांच्याकडून करण्यात आले. हा संपर्क क्रमांक प्रत्येक बॅरिकेडवर व मोक्याच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.